सोनिया गांधी यांची तीन दिवसांत १२ तास ईडी चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 09:26 AM2022-07-28T09:26:14+5:302022-07-28T09:26:39+5:30
नवे समन्स नाही; लवकरच आरोपपत्र दाखल करणार
आदेश रावल
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंगप्रकरणी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी अधिकाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी, बुधवारी तीन तास चौकशी केली. त्यावेळी ईडी कार्यालयात प्रियांका गांधीही उपस्थित होत्या पण त्या वेगळ्या दालनात होत्या. त्यांची एकूण १२ तास चौकशी झाली आहे. इडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची चौकशी पूर्ण झाली असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
सोनिया गांधी बुधवारी सकाळी ११ वाजताa ईडी कार्यालयात हजर झाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी होते. सोनियांच्या चौकशीस सव्वा अकरा वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास त्या ईडीच्या कार्यालयातून घरी रवाना झाल्या. यापूर्वी दोन दिवसांत त्यांना ६५ ते ७० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांना बुधवारी आणखी ३०-४० प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते. दरम्यान, नवी दिल्लीतील विजय चौकात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
एक प्रश्न ठरणार अडचणीचा
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, एका प्रश्नाचे उत्तर देणे हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांना कठीण जाणार आहे. यंग इंडिया कंपनीने ५० लाख रुपये काँग्रेस पक्षाला दिले. त्याबदल्यात एजेएल कंपनीचे ९० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. यंग इंडिया कंपनीचे एकूण भांडवल ५ लाख रुपये होते. मग या कंपनीने ५० लाख रुपये कुठून आणले हा तो अडचणीत आणणारा प्रश्न आहे.
निदर्शने करणाऱ्यांना घेतले ताब्यात
ईडीसारख्या यंत्रणांचा होत असलेला गैरवापर तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांतून विरोधी सदस्यांचे केलेले निलंबन या गोष्टींविरोधात दिल्लीत काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी बुधवारी धरणे धरले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी हेही आंदोलनात सहभागी होण्यासाठी संसद भवनात पोहोचले. ते गाडीतून उतरले व तितक्यात त्यांना दूरध्वनी आला. त्यामुळे ते तिथून परत निघाले.
मनोधैर्य खच्ची करण्याचा डाव : खरगे
काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी ईडीमार्फत चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात येत असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. खरगे म्हणाले, सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नाही. तरीही त्यांना ईडीचे अधिकारी वारंवार चौकशीसाठी बोलावत आहेत. पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव आहे.