'ईडी'च्या संदीप सिंगला हवालाने हवे होते लाचेचे २० लाख; २० रुपयांच्या नोटेचा फोटोही घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 06:52 AM2024-08-11T06:52:45+5:302024-08-11T06:53:42+5:30
मुंबईतील ज्वेलरवर झालेल्या छापेमारीनंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी सिंग याने संबंधित ज्वेलरकडे २० लाख रुपयांची लाच मागितली होती, सेवेतून केले निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ईडीचा सहायक संचालक संदीप सिंग यादव याने केलेल्या २० लाख रुपयांच्या लाचखोरीत नवी माहिती पुढे आली असून, सिंग याने लाचेची २० लाखांची रक्कम हवालाच्या माध्यमातून पाठविण्याची सूचना मुंबईस्थित ज्वेलरला केली होती. तसेच, याकरिता २० रुपयांच्या नोटेचा फोटो या व्यवहाराच्या शाश्वतीसाठीदेखील वापरला होता.
मुंबईतील ज्वेलरवर झालेल्या छापेमारीनंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी सिंग याने संबंधित ज्वेलरकडे २० लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, त्याने लाचेचे हे पैसे मुंबईत स्वीकरण्याऐवजी दिल्लीत स्वीकारले. एवढी मोठी रक्कम दिल्लीला पाठविण्यात अडचण असल्याचे सांगितल्यावर सिंग यानेच ज्वेलरला ही हवालामार्फत दिल्लीत पाठविण्याची सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच हवालाच्या व्यवहारासाठी एखाद्या विशिष्ट चलनी नोटेचा फोटो वापरला जातो. पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा अशा दोघांकडेही एकाच क्रमांकाच्या चलनी नोटेचा फोटो असतो. दोन्ही बाजूचे फोटो जुळले की मगच ज्याला पैसे द्यायचे असतात ते दिले जातात. सिंग याने याचसोबत दिल्लीतील व्यवहारासाठी एक विशिष्ट मोबाइल क्रमांकदेखील संबंधित ज्वेलरला दिला होता.
सेवेतून केले निलंबित
या सगळ्या घडामोडींनंतर प्रत्यक्ष व्यवहारावेळी संबंधित ज्वेलरने मुंबईतील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीनंतर सीबीआयने सापळा रचत सिंग याला अटक केली आहे. सिंग याला सीबीआयने अटक केल्यानंतर गुरुवारी ईडीनेदेखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला सेवेतून निलंबित केले आहे.