एचपीझेड पेमेंट गेटवेवर ईडीचा छापा; कारवाईत ९१ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 06:19 AM2023-04-26T06:19:30+5:302023-04-26T06:19:45+5:30
कारवाईत ९१ कोटींची मालमत्ता जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पैशांच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी पेमेंट गेट-वेची सुविधा पुरविणाऱ्या एचपीझेड या कंपनीच्या मुंबई, गुरुग्राम व बंगळुरू येथील कार्यालयांवर छापेमारी करत कंपनीच्या देशभरात असलेल्या विविध बँक खात्यांतील ९१ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीचे व्यवहार हाताळण्यात येत होते. सामान्य गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित करून भरभक्कम परतावा देण्याचे आमिष कंपनीने दाखवले होते. मात्र, या प्रकरणी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणी सर्वप्रथम नागालँड राज्याची राजधानी असलेल्या कोहिमा शहरात पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. मात्र, या घोटाळ्याची व्याप्ती देशव्यापी असल्याचे आणि यात शेकडो कोटींचे व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीने सुरू केला होता. या प्रकरणाची चौकशी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे. त्यावेळी, भूपेश अरोरा नावाच्या व्यक्तीची या घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीच्या तपासादरम्यान लक्षात आले. तसेच त्यावेळी कंपनीची २९ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती.
आतापर्यंत १७८ कोटी
तपासादरम्यान आणखी तपशील मिळाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा छापेमारी केली आणि यावेळी कंपनीच्या देशभरातील बँक खात्यात असलेले ९१ कोटी रुपये जप्त केले आहेत. दरम्यानच्या काळात देखील कंपनीची काही मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १७८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झालेली आहे.