७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 07:34 PM2024-10-11T19:34:15+5:302024-10-11T19:59:43+5:30
Delhi Drugs Case: गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
Delhi Drugs Case: नवी दिल्ली : आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) दिल्ली ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने ७६०० कोटी रुपयांच्या ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
ईडीचे पथक सध्या आरोपी आणि माजी आरटीआय सेल काँग्रेसचे अध्यक्ष तुषार गोयल यांचे वसंत विहारमधील घर, तसेच, राजौरी गार्डनमधील त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे घर, आरोपी हिमांशूचे प्रेम नगर येथील घर, मुंबईतील नालासोपारा येथील भरत कुमारचे घर, या व्यतिरिक्त दिल्लीतील झंडेवालान येथील तुषार बुक पब्लिकेशन आणि गुरुग्राममधील एबीएन बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर छापे टाकत आहेत.
१० दिवसांत ७६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
दरम्यान, कालच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रमेश नगर भागात छापा टाकून दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. गेल्या १० दिवसांत राजधानीत ७६०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याचवेळी, सात हजार कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जच्या जप्तीचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध लुकआउट परिपत्रकही जारी केले आहे. ज्यामध्ये भारतीय वंशाच्या ब्रिटीश नागरिकाचा समावेश आहे, जो पश्चिम दिल्लीत नुकत्याच झालेल्या २०८ किलो ड्रग्जच्या जप्तीपूर्वी देश सोडून पळून गेला होता.