जीव्हीके कंपनीवर ‘ईडी’चे छापे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:04 AM2020-07-29T05:04:26+5:302020-07-29T05:04:34+5:30
‘एमआयएएल’ घोटाळा : मुंबई, हैदराबादला कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनातील मनी लाँड्रिंगप्रकरणी जीव्हीके समूहाच्या मुंबई आणि हैदराबाद येथील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छापे घातले. जीव्हीके समूहाच्या प्रवर्तकांच्या घरांवरही छापे मारण्यात आले.
७ जुलै रोजी ईडीने जीव्हीके पॉवर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) आणि इतर काही कंपन्यांविरोधात मनी लॉँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याआधी सीबीआयने जीव्हीके समूहाचे प्रवर्तक जीव्हीके रेड्डी, संजय रेड्डी, एमआयएएल आणि इतर नऊ कंपन्यांविरुद्ध सरकारचे ७०५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविला होता.
एमआयएएल ही जॉइंट व्हेंचर कंपनी असून, जीव्हीके समूहातील जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज, एअरपोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एएआय) आणि काही विदेशी कंपन्या यात भागीदार आहेत. यात जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज आणि एएआय यांची हिस्सेदारी अनुक्रमे ५०.०५ टक्के आणि २६ टक्के
आहे.
सूत्रांनी सांगितले की, मुंबई आणि हैदराबादेतील एकूण नऊ ठिकाणी ईडीकडून तपासणी करण्यात येत आहे. ‘एमआयएएल’मधील निधी बेकायदेशीररीत्या वळवून प्रवर्तकांनी वैयक्तिक मालमत्ता खरेदी केल्या आहेत का, याची तपासणी ईडीकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरनुसार, अरोपींनी खर्च वाढवून दाखविणे, महसूल कमी दाखविणे आणि रेकॉर्डमध्ये फेरफार करणे या मार्गांचा वापर करून निधीचा अपहार केला.
घोटाळ्याचे चार भाग
याप्रकरणी सीबीआयने गेल्या महिन्यात धाडी टाकल्या होत्या. सीबीआयच्या एफआयआरमध्ये एमआयएएल घोटाळ्याचे पुढीलप्रमाणे चार भाग करण्यात आले आहेत.
च्बनावट कंत्राटी कामे दाखवून निधी हडपणे.
च्खर्च वाढवून दाखवून एमआयएएलचा राखीव निधी अन्यत्र वळविणे.
च्रिलेटेड-पार्टी-कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून एमआयएएलचा महसूल कमी दाखविणे.
च्एमआयएएलच्या निधीतून जीव्हीके समूहाच्या प्रवर्तकांचे तसेच कुटुंबीयांचे खर्च भागविणे.