चंदामामा मासिकाच्या मालकांना ईडीचा दणका, ४० कोटींची मालमत्ता जप्त
By मनोज गडनीस | Updated: October 10, 2023 21:18 IST2023-10-10T21:17:54+5:302023-10-10T21:18:20+5:30
२६ फ्लॅट, दुकाने ताब्यात; यापूर्वीही १६ कोटींची मालमत्ता केली होती हस्तगत

चंदामामा मासिकाच्या मालकांना ईडीचा दणका, ४० कोटींची मालमत्ता जप्त
मनोज गडनीस, मुंबई: लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या चंदामामा या मासिकाची निर्मिती करणाऱ्या तसेच दुसरीकडे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिओदेसिक या कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत कंपनीची ४० कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये २६ फ्लॅट्स व काही दुकानांचा समावेश आहे. यापूर्वी देखील ईडीने कंपनीची १६ कोटी ५२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
कंपनीच्या समभाग धारकांच्या पैशांवर डल्ला मारत ते हडप करत खाजगी मालमत्तांची खरेदी केल्याप्रकरणी २०१८ मध्ये कंपनीच्या संचालकांविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, देशातच नव्हे तर परदेशात देखील कंपनीने काही क्लिष्ट आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. उपलब्ध माहितीनुसार, २००८ मध्ये कंपनीने १२५ मिलियन अमेरिकी डॉलर इतक्या महाकाय रकमेच्या परदेशी रोख्यांची विक्री केली होती. परेदशात काही कंपन्यांची खरेदी करणे तसेच मूळ कंपनीचा विस्तार करण्यासाठी या पैशांची उभारणी केल्याचा दावा कंपनीने त्यावेळी केला होता. मात्र, तसे न करता रोख्यांच्या विक्रीतून आलेला पैसा कंपनीने आपल्या भारतातील मूळ कंपनीत पाठवला. या मूळ कंपनीने सॉफ्टवेअरच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे सांगत ते पैसे सहा बनावट कंपन्यांत वळवले व तिथून ते पैसे वैयक्तिक खात्यात वळवत या मालमत्तांची खरेदी केली. या प्रकरणी ईडीने यापूर्वी कंपनीचे संचालक प्रशांत मुळेकर, पंकज श्रीवास्तव, किरण कुलकर्णी आणि कंपनीचा कर सल्लागार दिनेश जाजोडीया याला अटक केली होती.