माफीचा साक्षीदार होण्याची वाझेची अनुमती ईडीने नाकारली; कारण अस्पष्ट, वाझे पुन्हा आरोपी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 07:45 AM2023-05-26T07:45:11+5:302023-05-26T07:45:23+5:30
गेल्यावर्षी जूनमध्ये ईडीच्या विशेष न्यायालयात ईडीने सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार होण्याची दिलेली अनुमती ईडीने रद्द केल्याचे समजते. मात्र, असा निर्णय ईडीने का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माफीचा साक्षीदार होणे रद्द झाल्यामुळे पुन्हा एकदा वाझे या प्रकरणात आरोपी असेल.
उपलब्ध माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारचालकांकडून दरमहा अवैधरित्या १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश वाझे याला दिले होते, असा दावा करत सीबीआयने उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एप्रिल, २०२१ मध्ये देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्याआधारे ईडीने अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच वाझे याने देशमुख यांच्या सांगण्यावरून चार कोटी रुपये जमा केल्याचा दावा ईडीने आपल्या आरोपपत्राद्वारे केला होता.
गेल्यावर्षी जूनमध्ये ईडीच्या विशेष न्यायालयात ईडीने सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. ईडीने अशी भूमिका घेतल्यानंतर सीबीआयनेही वाझेला माफीचा साक्षीदार होण्याची अनुमती दिली होती. मात्र, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशमुख यांना जामीन मंजूर करतेवेळी उच्च न्यायालयाने वाझेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वाझेच्या निवेदनावर अवलंबून राहणे ‘सुरक्षित’ नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. दरम्यान, अँन्टिलिया इमारतीच्या बाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी याच प्रकरणाशी संबंध असलेल्या मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वाझे अद्यापही एनआयएच्या अटकेत आहे.
माफीचा साक्षीदार पुन्हा आरोपी कसा?
एखाद्या व्यक्तीला तपास यंत्रणेने माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली असेल, पण त्या व्यक्तीने काही माहिती दडवली अथवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली, तर त्याला माफीचा साक्षीदार होण्यास दिलेली मान्यता रद्द करता येते. तसेच, त्याला पुन्हा आरोपी बनवून त्याच्या विरोधात केस चालवली जाते.