ईडीने वर्षभरात नोंदविले ५०५ टक्के अधिक गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 06:06 AM2023-04-04T06:06:39+5:302023-04-04T06:07:15+5:30
आठ वर्षांत तब्बल ९५ हजार कोटींची मालमत्ता जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाकाय व क्लिष्ट आर्थिक गुन्ह्यांची तपासणी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या चार वर्षांच्या तुलनेत सरत्या वर्षांत तब्बल ५०५ पट अधिक गुन्हे नोंदविल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०१८-१९ या आर्थिक वर्षात ईडीने एकूण १९५ गुन्हे नोंदविले होते तर, २०२१-२२ या वर्षामध्ये ईडीने १,१८० गुन्ह्यांची नोंद केली आहे.
विशेष म्हणजे, केवळ गुन्हेच नव्हे तर ईडीकडून होणाऱ्या छापेमारीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याची माहिती आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, २००४ ते २०१४ या कालावधीमध्ये ईडीने देशभरात एकूण ११२ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीच्या माध्यमातून एकूण ५,३४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली, तर २०१४ ते २०२२ या कालावधीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशभरामध्ये २,९७४ ठिकाणी छापेमारी केली आणि या माध्यमातून तब्बल ९५ हजार ४३२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
मोबाइल गेमिंग ॲप कंपन्या रडारवर
राजकीय पक्ष व नेते यांच्यावरील कारवाईत एकीकडे वाढ झालेली असतानाच गेल्यावर्षी मोबाइल ॲप, क्रिप्टो करन्सी आदी माध्यमांतून होणाऱ्या व्यवहारांत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या गुन्ह्यांची ईडीने नोंद केली आहे.
मोबाइल गेमिंग ॲपच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचे प्रकरण गेल्यावर्षी या तपास यंत्रणेने उजेडात आणले होते, तर मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर देखील ईडीने कारवाईचा मोठा बडगा उगारला होता. या प्रकरणी ६०० पेक्षा जास्त कंपन्यांची झाडाझडती घेण्यात आली होती.