ईडीने ६७ पवनचक्क्या जप्त केल्या; ज्या कंपनीने बनविल्या त्यात घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:04 AM2022-08-03T11:04:39+5:302022-08-03T11:05:29+5:30

सुराणा समूहाच्या ३,९८६ कोटींचे बँक घोटाळा प्रकरण; ११३ कोटींची मालमत्ता जप्त

ED seized 67 windmills of Surana Group in connection bank Scam of 3986 crores | ईडीने ६७ पवनचक्क्या जप्त केल्या; ज्या कंपनीने बनविल्या त्यात घोटाळा

ईडीने ६७ पवनचक्क्या जप्त केल्या; ज्या कंपनीने बनविल्या त्यात घोटाळा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्य कंपनीला कर्जापोटी मिळालेला पैसा बनावट कंपन्या स्थापन करून त्यांत वळविणे तसेच कर्जाची परतफेड न करता कर्ज थकविणे, या प्रकरणी सुराणा उद्योग समूहाला ईडीने दणका देत कंपनीची ११३ कोटी ३२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये ६७ पवनचक्क्यांचाही  समावेश आहे. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांवर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चेन्नईस्थित सुराणा समूहाने सरकारी बँकांचे ३,९८६ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच तीन एफआयआर दाखल करीत कंपनीच्या संचालकांना अटक केली आहे. 
या एफआयआरच्या आधारे ईडीने पुढील तपास सुरू केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीला बँकेकडून कर्ज प्राप्त झाल्यानंतर, कंपनीने काही बनावट कंपन्या स्थापन केल्या. यामध्ये आपले कर्मचारी, आपले नातेवाईक यांची संचालकपदी नेमणूक दाखवली. 

तसेच, या कंपन्यांसोबत केवळ कागदोपत्री खरेदी-विक्रीचा व्यवहार दाखविला. हे सारे करताना बनावट कंपन्यांत वळविलेले पैसे आणि कागदोपत्री व्यवहारातील पैसा, हे सारे पैसे कंपनीने संचालकाच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केले. या कर्जापोटी प्राप्त पैशांतून कंपनीने परदेशांतदेखील दोन ठिकाणी मालमत्तांची खरेदी केली. 
हे करताना बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी बँकेचे कर्ज खाते थकीत झाले. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश सुराणा, विजय सुराणा आणि अन्य दोन बोगस संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. 

स्वतःच्याच पवनचक्क्या पुन्हा घेतल्या विकत
बँकेचे कर्ज थकल्याप्रकरणी यापूर्वी बँकेने कंपनीच्या ६७ पवनचक्क्यांची जप्ती केली होती. तसेच, कर्जापोटी दिलेल्या रकमेच्या वसुलीसाठी त्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, सुराणा समूहाने एका बेनामी कंपनीच्या माध्यमातून पुन्हा त्या पवनचक्क्यांची खरेदी केल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले आहे.

Web Title: ED seized 67 windmills of Surana Group in connection bank Scam of 3986 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.