‘यलो ट्यून’ला ईडीचा दणका, अवैध क्रिप्टो करन्सी; ३७० कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 08:51 AM2022-08-14T08:51:03+5:302022-08-14T08:51:26+5:30
cryptocurrency : उपलब्ध माहितीनुसार, बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीचे व्यवहार होत असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
मुंबई : क्रिप्टो करन्सी बाजारातील वझीरेक्स कंपनीची मालमत्ता गेल्याच आठवड्यात ईडीने जप्त केल्यानंतर आता यलो ट्यून आणि त्याची सहयोगी कंपनी फ्रिव्होल्ट या कंपनीची मिळून एकूण ३७० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याचे आदेश दिले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीचे व्यवहार होत असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांनी यलो ट्यून कंपनीच्या कार्यालयांवर, तसेच संबंधित कार्यालयांवर शुक्रवारी छापेमारी केली. या दरम्यान, कंपनीने भारतात होणारे व्यवहार सुमारे २३ बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या कंपनीचे संस्थापक चिनी असल्याचेही दिसून आले आणि ते फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ईडीने ही जप्तीची कारवाई केली आहे.