लालूप्रसाद यादव, मुलगा तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स, काय आहे नक्की प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 05:25 PM2023-12-20T17:25:59+5:302023-12-20T17:26:31+5:30
तेजस्वी यादवांना २२ तर लालू यांना २७ डिसेंबरला चौकशीसाठी समन्स
Lalu Prasad Yadav - Tejashwi Yadav, ED Summon ( Marathi News ) : गेल्या काही दिवसांपासून ईडी ही तपास यंत्रणा प्रचंड चर्चेत आहे. मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणी ही यंत्रणा तपास करत असते. पण सत्ताधारी पक्ष या आणि इतर काही तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे आरोप विरोधी पक्ष लावत आहेत. अशातच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र सध्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या दोघांना ईडीने समन्स बजावले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना समन्स बजावले आहेत. ईडीने लालू यादव यांना 27 डिसेंबरला तर तेजस्वी यादव यांना 22 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.
कोणत्या प्रकरणात बजावले समन्स?
नोकरीच्या बदल्यात जमिनीच्या प्रकरणात लालू कुटुंबाच्या अडचणी वाढू शकतात. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना नोकरीसाठी जमीन घोटाळ्यात आरोपी करण्यात आले आहे. ईडीच्या समन्सपूर्वी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने सीबीआयकडून उत्तर मागितले आहे. आरजेडी नेत्यांनी केलेल्या अर्जात आरोपपत्रासह दाखल केलेल्या कागदपत्रांचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
18 मे 2022 रोजी सीबीआयने लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव, मिसा भारती यांच्यासह 17 जणांविरुद्ध जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना ड गटातील अनेक उमेदवारांना रेल्वेच्या विविध विभागांच्या पदांवर नियमबाह्य पद्धतीने नियुक्त केल्याचा आरोप आहे. 2004 ते 2009 दरम्यान झालेल्या या सर्व नियुक्त्यांमध्ये लालू यादव यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर जमीन घेतली होती असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.