रवींद्र वायकर यांना १७ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ‘ईडी’चे समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:55 AM2024-01-11T06:55:00+5:302024-01-11T06:55:30+5:30
मंगळवारी वायकर यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी ईडीने केली होती छापेमारी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) येत्या १७ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहे. मंगळवारी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी, छापेमारी केली होती.
जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी गेल्यावर्षी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे महापालिकेत कार्यरत उपअभियंता संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडी तपास करत आहे. याप्रकरणी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून, अलीकडेच महापालिकेने या हॉटेलच्या बांधकामाची परवानगी रद्द केली आहे.