ईडीने मनावर घेतले! तामिळनाडू पोलिसांसोबत वाद; प्रकरण एफआयआरपर्यंत गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:25 AM2023-12-26T10:25:50+5:302023-12-26T10:26:29+5:30
लोकांची अफरातफरीची प्रकरणे मिटविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अंकित तिवारी हा अधिकारी लाच घेत होता.
लाचखोर ईडी अधिकाऱ्यावरून ईडी आणि तामिळनाडू पोलिसांमध्ये जुंपली आहे. ईडीच्या अधिकाऱ्याला २० लाख रुपयांची लाच घेताना तामिळनाडूच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने अटक केली होती. आता या प्रकरणाच्या चौकशीवरून ईडी आणि पोलीस समोरासमोर आले आहेत. प्रकरण एवढे वाढलेय की ईडीने पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकांची अफरातफरीची प्रकरणे मिटविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अंकित तिवारी हा अधिकारी लाच घेत होता. तिवारीच्या या लाचखोरीची तक्रार राज्याच्या पोलीस खात्याला प्राप्त होताच त्यांनी मदुराईमधून तिवारीला रंगेहाथ पकडले होते. यानंतर पोलिसांनी ईडीच्या कार्यालयात रेड टाकली होती. ही बाब ईडीला खटकली आहे.
राज्याच्या अधिकाऱ्यांनी ईडीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. सुमारे ३५ अधिकारी ईडी कार्यालयात अवैधरित्या आल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच त्यांनी आपल्यासोबत ईडीच्या अतिसंवेदनशील फाईल्स नेल्याचे ईडीने म्हटले आहे. पोलीस महासंचालकांना पत्र लिहून ईडीने ही तक्रार केली आहे. तसेच राज्याच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यास सांगितले आहे.
तामिळनाडूच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने (DVAC) 1 डिसेंबर रोजी अंमलबजावणी ED अधिकाऱ्याला अटक केली होती. दिंडीगुल जिल्ह्यातील एका डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आल्याचे संचालनालयाने सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अंकित तिवारी हे ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसह अनेक लोकांना धमकावत होते आणि अंमलबजावणी संचालनालयातील केस बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत होते.