शिक्षण दहावी पास, मात्र उभारले एमडी ड्रग्जचे २५० कोटींचे साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:55 PM2024-03-28T12:55:33+5:302024-03-28T12:55:45+5:30
सांगलीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त, गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सांगली येथील एमडी निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करत कुर्ला, सांगली, सुरत या ठिकाणी कारवाई करत १० जणांना बेड्या ठोकल्या आहे. या कारवाईत पोलिसांनी २५२ कोटी रुपयांचा १२६ किलो एमडीसाठा जप्त केला आहे. टोळीचा म्होरक्या प्रवीण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे (३४) केवळ दहावी पास असून त्याने उत्तर प्रदेशमध्ये चार वर्षे एमडी बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन सांगलीत ड्रग्ज बनविण्याचा कारखाना थाटल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.
कुर्ला येथे गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली परवीन बानो शेख (३३) या महिलेला ६४१ ग्रॅम एमडीसह अटक केली. १६ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या कारवाईत १२ लाख २० हजार व २५ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. पोलिस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी तिची चौकशी केली असता मीरारोड येथील व्यक्तीकडून हे एमडी घेतल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मीरारोड येथील एमडी विक्रेता साजीद शेख ऊर्फ डेबस (२५) याला उचलले.
त्याच्याकडून सहा कोटी किमतीचा तीन किलो एमडी व तीन लाख ६८ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्या चौकशीत तो सुरत येथील दोघांना एमडी विकत असल्याचे समोर आले. मग त्यानुसार निरीक्षक शिंदे, उबाळे, सपोनि अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्निल काळे, रामदास कदम, शेलार व पथकाने सुरतेला जाऊन इजाजअली अन्सारी (२४) आणि आदिल बोहरा (२२) या दोघांना अटक केली.
सांगलीतून चालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
आरोपींच्या चौकशीत ते सांगलीतून हा एमडी घेत असल्याचे समोर येताच, उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सांगलीतले इरळे गाव गाठून द्राक्षाच्या शेताच्या आड लपून गुपचूप सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केला.
त्याठिकाणी १२२ किलो ५०० ग्रॅम वजनाचा एमडी, एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून सहा जणांना अटक केली. सांगलीतून पोलिसांनी प्रवीण शिंदे (३४), वासुदेव जाधव (३४), प्रसाद मोहिते (२४), विकास मलमे (२५), अविनाश माळी (२८) आणि लक्ष्मण शिंदे (३५) अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
एका किलो मागे एक लाख
टोळीचा म्होरक्या प्रवीण हा मूळचा सांगलीचा रहिवासी असून परिवारासह मीररोड येथे स्थायिक झाला होता. दहावीपर्यंत शिकलेल्या प्रवीणने चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात जाऊन एमडी बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रवीणला प्रत्येक किलो मागे एक लाख रुपये मिळत होते.