शिक्षण एमबीए, एमसीए कारनामे मात्र ‘फर्जी’; उच्चशिक्षितांच्या टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 05:39 AM2023-02-22T05:39:57+5:302023-02-22T05:40:22+5:30
१,६०० सिम कार्ड्सचा वापर, सायबर शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर, २०२२ ते २ जानेवारी, २०२३ दरम्यान या टोळीने अनोळखी बँकेतून सौरभ शर्मा बोलत असल्याचे भासवून वेलिंग्टन क्लबच्या मोफत सदस्यत्वाबाबत सांगितले.
मुंबई : हॅलो, मी बँकेतून बोलत आहे. तुम्ही सिटी बँक डायनर्स क्लबचे कार्ड घेतल्यास ताडदेवच्या वेलिंग्टन क्लबचे सदस्यत्व तुम्हाला मोफत मिळेल, अशा भूलथापा देऊन मुंबईसह राज्यातील हायप्रोफाइल मंडळींना टार्गेट करणाऱ्या उच्चशिक्षितांच्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली असून, विशेष म्हणजे, पकडण्यात आलेले आरोपी एमबीए, एमसीए, मेकॅनिकल इंजिनीअर वगैरे शिक्षण घेतलेले आहेत. या गुन्ह्यात फसवणुकीसाठी तब्बल १,६०० सिम कार्ड्सचा वापर करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी, जॉन राज (३५, हॉटेल मॅनेजमेंट), नंदकुमार एम. चंद्रशेखर (४२, एमसीए), पवथराणी रम्की पार्थसारथी एस.एल. (३३ एमबीए), अय्यप्पन मुरुगसेन (३५, मेकॅनिकल इंजिनीअर), प्रेमसागर रामस्वरूप (२३, दहावी, उत्तर प्रदेश) या आरोपीना अटक केली आहे, तर या टोळीचा मास्टरमाइंड गुजरातचा आशिष रवींद्र नाथन याचा शोध सुरू आहे. आरोपींनी १६ गुन्ह्यांतून सव्वाकोटींची फसवणूक केले आहे. आरोपी मुंबई व नवी मुंबईतील नवीन बी.एम.डब्लू, मर्सिडिज कार खरेदी करणाऱ्याची माहिती मिळवून क्लबची जाहिरात व्हॉट्सॲपद्वारे पाठवून संपर्क करायचे.
सायबर शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर, २०२२ ते २ जानेवारी, २०२३ दरम्यान या टोळीने अनोळखी बँकेतून सौरभ शर्मा बोलत असल्याचे भासवून वेलिंग्टन क्लबच्या मोफत सदस्यत्वाबाबत सांगितले. बनावट माहितीपत्रके पाठवून विश्वास संपादन केला. तक्रारदार जाळ्यात येताच, दोन लिंक पाठवून त्यांच्या खात्यातील पावणेदहा लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. पोलिस तपासात सिटी बँक डायर्नस क्बलच्या नावाने मुंबई व नवी मुंबई परिसरात ३२ पेक्षा अधिक गुन्हे असल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ.बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्याचे प्र.पो.नि. सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात महाराष्ट्र या राज्यांतून हे रॅकेट ऑपरेट होत असल्याचे तांत्रिक तपासातून समोर आला. त्यानुसार कारवाई करून वरील पाच जणांना अटक करण्यात आली.
क्रेडिट कार्डच्या नावानेही फसवणूक
यातील मुख्य सूत्रधार आशिष आणि अटक आरोपी अय्यप्पन मुरुगसेन यांनी अशाच प्रकारे यापूर्वी एका नामांकित कंपनीच्या क्रेडिट कार्डच्या नावाने फसवणूक केल्याचे समोर आले. आशिषच्या दिल्लीतील घरातून महत्त्वाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्या आधारे अधिक तपास सुरू आहे. आशिषने आयआयटीतून अर्धवट शिक्षण घेतले आहे.