शिक्षणाधिकारी निघाला लाचखोर; १ लाखांची लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 08:37 PM2019-01-07T20:37:20+5:302019-01-07T20:38:58+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदार शिक्षकांला 1 नोव्हेंबर 2018 पासून शिक्षक मान्यतेसाठी व पगार काढण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडे ह्या संदर्भात विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी ह्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
पालघर - एका शिक्षकाकडून 1 लाखाची लाच घेताना पालघर जिल्हापरिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले ह्यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदार शिक्षकांला 1 नोव्हेंबर 2018 पासून शिक्षक मान्यतेसाठी व पगार काढण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडे ह्या संदर्भात विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी ह्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तर न्यायालयाचे आदेश असताना शिक्षणाधिकारी देसले ह्यांनी तक्रारदाराच्या प्रकरणात अनेक त्रुटी काढल्या. त्यांनी ह्या प्रकरणी 3 लाखाची मागणी केल्यानंतर 2 लाखावर तडजोड झाली. त्यातील एक लाखाची रोख रक्कम त्यांच्या कार्यालयातील त्यांच्या गाडीतील डिकीत ठेवल्यानंतर लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी आफळे व त्यांच्या टीमने झडप घालून त्यांना अटक केली. अधिक चौकशीसाठी शिक्षणाधिकाऱ्यासोबत असलेल्या एका शिक्षकही पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पालघर पोलीस ठाण्यात सुरू आहे.