शिक्षण अधिकारीच निघाली ठग; पालिकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा, गोव्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 09:23 PM2021-06-30T21:23:25+5:302021-06-30T21:24:20+5:30
Crime News : मंगळवाऱी भोसले दाम्पत्याला गोव्यातून बेडया ठोकल्या आहेत.
मुंबई : पालिकेची शिक्षण अधिकारीच पती आणि दिरासह फसवणूकीचे रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती मालमत्ता कक्षाच्या कारवाईतून उघड़किस आली आहे. प्रांजली गोसावी -भोसले असे शिक्षण अधिकारी महिलेचे नाव असून ती मुलुंड टी वॉर्डमध्ये कार्यरत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर पासून ती ग़ैरहजर होती. अखेर, मंगळवाऱी भोसले दाम्पत्याला गोव्यातून बेडया ठोकल्या आहेत. भोसले दाम्पत्याने आतापर्यंत सव्वा दोन कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा संशय गुन्हे शाखेला असून त्यानुसार अधिक तपास सुरु आहे.
तरुण तरुणीना पालिकेच्या विविध खात्यात नोकरी लावण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली. तसेच या फसवणूकीप्रकरणी १७ जून रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान यात भोसले आपल्या पदाचा ग़ैरवापर करत पती आणि दोन दिराच्या मदतीने हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. यात पती लक्ष्मण सर्व व्यवहार हाताळत होता. तर दिर राजेश आणि चुलत दिर महेंद्र भोसले कमिशनवर तरुण तरुणीना त्यांच्यापर्यंत पोहचवत होते. भोसले शिक्षण अधिकारी असल्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून यात पैसे देत होते. मात्र पैसे देवूनही नोकरी मिळत नसल्याने काही तरुणांनी पोलिसात धाव घेतली.
भोसले ही गेल्या वर्षी ऑक्टोबर पासून ग़ैरहजर होती.यात मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी सत्यजित ताईत वाले सचिन कदम नागेश पुराणिक मनोज पाटील गादेकर साळुंखे राजेश सावंत आणि पोलीस अंमलदार यांनी तपास सुरु केला. तपासात ही मंडळी गोवा येथील कंडोलिम भागात लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने भोसले दाम्पत्याला बेडया ठोकल्या आहेत. त्यांच्या चौकशीतून ठाणे आणि कल्याण येथे राहणाऱ्या साथीदार असलेले दिरांची माहिती मिळताच त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
तुमचीही फसवणूक झाली आहे का?
भोसले कुटुंबियामुळे शेकडो तरुणांची फसवणूक झाल्याचा संशय पथकाला आहे. यात तुमचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन मालमत्ता कक्षाने केले आहे. किंवा २३७८०२९९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे नमूद केले आहेत.