गँगवारची झळ पोलीस ठाण्याला : तहसीलचे ठाणेदार मालवीय यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:32 AM2020-03-18T00:32:57+5:302020-03-18T00:36:17+5:30
शनिवारी मध्यरात्री बंगाली पंजा भागात झालेल्या गँगवॉरने तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्माण केलेला तणाव जैसे थेच आहे. गुंडांच्या दोन गटातील वैमनस्य यामुळे अधिक तीव्र झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी मध्यरात्री बंगाली पंजा भागात झालेल्या गँगवॉरने तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्माण केलेला तणाव जैसे थेच आहे. गुंडांच्या दोन गटातील वैमनस्य यामुळे अधिक तीव्र झाले आहे. कुख्यात वसीम चिऱ्या किंवा त्याचे साथीदार हाती लागलेले नाही. या पार्श्वभूमीवर, तहसीलचे ठाणेदार अरुणकुमार मालवीय यांची बदली झाल्याने उलटसुलट चर्चेत भर पडली आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांना तहसीलचे ठाणेदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लकडगंज-शांतिनगरचा कुख्यात गुंड वसीम चिऱ्या तसेच त्याचे साथीदार दानिश आणि त्यांचा प्रतिस्पर्धी आवेश यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचा भडका उडाला. आवेश आणि त्याच्या साथीदारांनी शनिवारी रात्री वसीमचा साथीदार मोहसीन अकोला याला बेदम मारहाण केली. त्याने कसाबसा जीव वाचवून तेथून पळ काढला. ही माहिती त्याने वसीम चिऱ्या आणि दानिशला दिली. त्यामुळे हे दोघेही २० ते २५ साथीदारांसह बंगाली पंजा भागात पोहचले. वसीमने ५ फायर (गोळ्या झाडल्या) केले तर, १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. यामुळे त्या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेतली. आरोपींना तातडीने हुडकून काढा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, असे कडक आदेश दिले. मात्र, ४८ तास होऊनही सानू वगळता कुणी पोलिसांच्या हाती लागले नाही. या पार्श्वभूमीवर, सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी तहसीलचे ठाणेदार मालवीय यांची वाहतूक शाखेत बदली केली. त्यांच्या रिक्त पदी वाहतूक शाखेचे जयेश भांडारकर यांची नियुक्ती केली.