सुसाट वाहतुकीसाठी हवे प्रभावी नियाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 10:29 AM2022-10-10T10:29:19+5:302022-10-10T10:29:34+5:30
मुंबईत १९७९ मध्ये वाहतूक विभागाचा पोलीस उपायुक्त म्हणून माझी नियुक्ती झाली तेव्हा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी योग्य सिग्नल यंत्रणा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य रणनीती आखल्यामुळे वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली.
- डॉ. पी. एस. पसरिचा
वाहतूक तज्ज्ञ, माजी पोलीस आयुक्त
सध्या सर्वत्र इन्फ्रास्ट्रक्चर, खासगी वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. परिणामी रहदारीत वाढ झाली. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत वेळोवेळी बदल करत ती अपडेट करणे गरजेचे आहे. खराब सिग्नल व्यवस्थापन वाहतुकीच्या समस्या वाढवते. सिग्नल यंत्रणेवर विविध सिग्नल टाइम प्लॅन उपलब्ध आहेत परंतु त्यांचा उपयोग होताना दिसत नाही. सिग्नल पॅटर्नच्या नियमित अभ्यासासह, दिवसाच्या विविध स्लॉटसाठी भिन्न सिग्नल वेळ असणे आवश्यक आहे. सध्या कोणताही पद्धतशीर दृष्टिकोन नाही. तसेच विभागांमध्ये समन्वय दिसून येत नाही. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत हाेईल.
मुंबईत १९७९ मध्ये वाहतूक विभागाचा पोलीस उपायुक्त म्हणून माझी नियुक्ती झाली तेव्हा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी योग्य सिग्नल यंत्रणा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य रणनीती आखल्यामुळे वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली. पुढे वाहतूक व्यवस्थापनाचा अभ्यास सुरू केला. जे शिकत होतो त्याचे प्रत्यक्षात प्रयोग सुरू केले. सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. देश, विदेशातून कौतुक झाले. पुढे यामध्ये पीएच.डी. घेतली. विदेशात जाऊन शिक्षण घेतले. याच अभ्यासातून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार केले. सुरुवातीला आम्हाला कायदेशीर दर्जा असलेली युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (UMTA) सारखी संस्था तयार करायची आहे. खासगी कारचा वापर कमी करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
चांगल्या रस्त्यांच्या खुणा आणि चिन्हांसह गतिमान सिग्नल वेळेसह चांगले वाहतूक व्यवस्थापन लागू करणे आवश्यक आहे. यामुळे सुरक्षितता तसेच रहदारी सुधारेल आणि लोकही कायद्याचे पालन करतील. पार्किंग व्यवस्थेसाठी मोठ्या मैदानाखाली अंडरग्राउंड पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे.
सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी डी-मेरिटिंग प्रणालीसह प्रभावी ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली असावी. तरच लोकांना ड्रायव्हिंग लायसन्सचे महत्त्व समजेल.
ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याची प्रक्रिया संगणकीकृत असावी, जसे की पासपोर्टच्या बाबतीत आहे. पादचाऱ्यांना लहान अंतरासाठी चालण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले पदपथ उपलब्ध करून देणे आवश्यक आहेत.
वाहतूक नियमाबाबत मुलांना पहिलीपासूनच शिक्षण देणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतुकीबाबत लहानपणापासून मुलांमध्ये वाहतूक नियम पाळण्याबाबत जागरुकता निर्माण होईल. पुढे होणारे अपघात टाळण्यास मदत होईल.