‘त्या’ दाम्पत्याच्या सुटकेसाठी मुंबई पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 04:06 AM2020-10-27T04:06:59+5:302020-10-27T04:07:32+5:30
Crime News : शरीकची काकी तब्बसुम रियाज कुरेशी हिने तिचा साथीदार निझाम काराच्या मदतीने या दाम्पत्याला हनिमून पॅकेज देण्याच्या नावाखाली सोबत चरस पाठविल्याचे एनसीबीच्या चौकशीत उघड झाले.
मुंबई : निर्दोष असतानाही कतारच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कुरेशी या दाम्पत्याच्या सुटकेसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युराेसाेबतच मुंबई पोलिसांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षी ६ जुलै रोजी कतारच्या दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ किलो चरससह या दाम्पत्याला पकडण्यात आले. त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. शरीकची काकी तब्बसुम रियाज कुरेशी हिने तिचा साथीदार निझाम काराच्या मदतीने या दाम्पत्याला हनिमून पॅकेज देण्याच्या नावाखाली सोबत चरस पाठविल्याचे एनसीबीच्या चौकशीत उघड झाले. त्यानुसार एसीबीकडून दोघांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असताना, सोमवारी मुंबई पोलिसांनीही प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले.
२२ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी निझाम आणि तब्बसुमला १३ ग्रॅम कोकेनसह अटक केली. तर दुसरीकडे एनसीबीने ड्रग्ज रॅकेट प्रकरणात १ किलो ४७४ किलो चरसच्या तस्करीत वेद राम, महेश्वर, शाहनवाज गुलाम चोराटवाला आणि शबाना चोराटवाला यांनाही अटक केली. त्यांच्या तपासात निझाम कारा आणि त्याची पत्नी शाहिदाने शाहनवाज आणि शबानालाही ड्रग्ज दिल्याचे समोर आले.
७ सप्टेंबर रोजी निझामला जामीन मिळताच एनसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याच्यावर लक्ष ठेवले. अखेर १४ ऑक्टोबर रोजी निझाम कारा आणि शाहिदा त्यांच्या हाती लागले. त्यांच्या चौकशीत त्यांनीच तब्बसुममार्फत कुरेशी दाम्पत्याला यात अडकविल्याचे स्पष्ट झाले.