अंडी विक्रेता बनला चोर; गुंगीचं औषध देऊन लुटायचा प्रवाशांना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:13 PM2019-01-24T14:13:59+5:302019-01-24T14:16:09+5:30
रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जगदीश साहू असं त्याचं नाव आहे. तसेच दीपक सोनी आणि साईल खान हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मुंबई - बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्याला रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली. जगदीश साहू असं त्याचं नाव आहे. तसेच दीपक सोनी आणि साईल खान हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विनय गाडगीळ, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संतोष धनवटे, सहायक निरीक्षक किरण मतकर, पोलीस हवालदार सुनील लोणकर, बबन कदम, दिलीप खोतकर, पोलीस नाईक महेश निकम, लक्ष्मण कुटे, पृथ्वीराज मोरे, राहुल माने यांचे पथक तपास करत होते. तपासादरम्यान लोणकर आणि स्टाफ हे अंधेरी येथे आले त्यावेळी पोलिसांना पाहून जगदीश साहू पळ काढू लागला. त्याला पकडून पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान जगदीशने दीपक आणि साईलच्या मदतीने चोऱ्या केल्याचे कबुल केले.
जगदीश, दीपक आणि साईल हे तिघेही भोपाळचे रहिवासी आहेत. जगदीश हा अयोध्या नगर येथे अंडे विक्री करायचा. दरम्यान, जगदीशची दीपकसोबत ओळख झाली. 2014 मध्ये दीपक हा तुरुंगामधून सुटला. त्यानंतर ते तिघे मिळून एक्स्प्रेसमध्ये चोऱ्या करू लागले. दीपक आणि साईल हे एकटा असलेल्या प्रवाशाला लक्ष करायचे. त्याला चहा, कॉपी, बिस्किटमधून गुंगीचे औषध द्यायचे. प्रवासी बेशुद्ध झाल्यावर दीपक आणि साईल हे प्रवाशाजवळील सामान चोरी करून नेण्याचे काम जगदीश करत नाही. दीपक हा त्याच्या सासऱ्याच्या औषधाच्या चिठ्ठीचा वापर करून मेडिकलमधून औषध खरेदी करायचा. त्या गुंगीच्या औषधाचा वापर चोरीसाठी करत असे अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.