वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा आठ वेळा गर्भपात, पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा, उच्चभ्रू वस्तीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:13 AM2021-08-16T08:13:06+5:302021-08-16T08:14:38+5:30
Crime News : भारतामध्ये बंदी असलेल्या ट्रीटमेंटसाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास ८ वेळा ही ट्रीटमेंट करून गर्भपात केला.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : उच्चशिक्षित, श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब बघून, निवृत्त न्यायाधीश असलेल्या वडिलांनी थाटामाटात मुलीचा विवाह करुन दिला. मात्र, याच प्रतिष्ठेच्या आड विकृत मानसिकता दडली होती. वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा या हव्यासापोटी पतीने या निवृत्त न्यायाधीशांच्या मुलीचा परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये समोर आली आहे.
सासरच्यांनी घराबाहेर काढल्यानंतर, मुलीने दादर पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी या प्रकरणी वकील कुटुंबाविरुद्ध गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यासह हुंड्यासाठी छळ व अन्य कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या आई-वडिलांसोबत ४० वर्षीय तक्रारदार महिला राहतात. वकिली क्षेत्रातील प्रतिष्ठित मुलासोबत २००७ मध्ये विवाह लावून दिला. सोबत ६२ तोळे सोन्याचे दागिनेही दिले. पती व सासू, सासरे वकील, तर ननंद डॉक्टर आहे. महिन्याला ७ ते ८ लाख उत्पन्न आहे.
‘मला माझा वंश व मालमत्ता जपण्यासाठी मुलगा हवाय,’ म्हणत मारझोड सुरू झाली. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरांकडे मुलगा होण्यासाठी उपचार घेतले, तसेच पतीने प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (जन्मापूर्वी लिंग तपासणीसाठी बीजाची अंमलबजावणी) या टेस्टसाठी बॅंकॉकमध्ये नेले. तेथे ८ वेळा गर्भ धारणेच्या आधी एम्ब्रियोच्या लिंगाची (बीजाची) परीक्षा करून उपचार व शस्त्रक्रिया करीत होते. यासाठी जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त हार्मोनल व स्टिरॉइड इन्जेक्शन देण्यात आली होती. भारतामध्ये बंदी असलेल्या ट्रीटमेंटसाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास ८ वेळा ही ट्रीटमेंट करून गर्भपात केला.
न जन्मलेल्या मुलासाठी कोट्यवधी रुपये खर्च
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या काही दिवसांतच पतीकडून छळ सुरू झाला. सासू आणि पतीने संयुक्त खाते उघडून खात्यातील ३४ लाख रुपये त्यांच्या खात्यात वळते केले. घरात मोलकरीण बनविले. २००९ मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर अत्याचारात वाढ झाली. २०११ मध्ये पुन्हा गर्भवती राहिल्याने पतीने डॉक्टराकडे नेले आणि मूल नको असल्याचे सांगत गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले.
२०१५ मध्ये पुन्हा मारहाण झाली. यात ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने तिने घर सोडले. मुलीच्या वाढदिवसासाठी १० रुपयांचे चॉकलेट घेतले नाही. मात्र, न जन्मलेल्या वंशाच्या दिव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. जवळपास ६८ तोळे सोने व रोख ७० लाख रुपये सासरच्या मंडळीकडे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.