पंजाब नॅशनल बँकेला आठ कोटींचा गंडा; मुंबईतील कंपनीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:17 AM2023-04-29T06:17:25+5:302023-04-29T06:17:47+5:30
मुंबईतील प्लाडेल कंपनीवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आकर्षक नक्षीकाम केलेल्या परफ्युमच्या बाटल्यांची निर्मिती करणाऱ्या प्लाडेल मल्टिमीडिया प्रा.लि. या मुंबईस्थित कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला ८ कोटी ६३ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उजेडात आली असून, या प्रकरणी मुंबईत सीबीआयकडे कंपनीच्या तीन संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव येथे कार्यालय असलेल्या या कंपनीने विस्तारासाठी पंजाब नॅशनल बँकेकडे साडेनऊ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. कंपनीकडे असलेल्या मालाची किंमत, तसेच कंपनीकडे असलेले काही भूखंड कंपनीने या कर्जाकरिता तारण ठेवले होते. मात्र, कर्ज मिळाल्यानंतर काही कालावधीतच कंपनीने कर्जाची परतफेड थांबविली होती. यानंतर, बँकेने जेव्हा कंपनीच्या संचालकांशी संपर्क केला, तेव्हा त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर, कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेने कर्जासाठी तारण ठेवलेल्या मालमत्तेची चाचपणी सुरू केली. कंपनीने तारण ठेवलेल्या नवी मुंबई येथील काही भूखंडांची बँकेने विक्रीही केली. मात्र, त्यातून केवळ ९२ लाख रुपयेच बँकेला प्राप्त झाले. जे बँकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कर्ज खात्यामध्ये जमा केले. मात्र, उर्वरित रक्कम बँकेला न मिळाल्याने, बँकेने मुंबईत सीबीआयकडे गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी पत्राद्वारे २० एप्रिल रोजी तक्रार केली. या लेखी तक्रारीची दखल घेत, सीबीआये कंपनीचे संचालक धवल कीर्तिकुमार पारीख, निकिता चंद्रकांत जैन, भानुबेन निसार या तीन संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.