आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू काशिलिंग आडकेसह आठजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 09:30 PM2020-04-14T21:30:27+5:302020-04-14T21:54:01+5:30
कासेगावमध्ये दारूअड्डा, जुगार : दीड लाखाचा माल जप्त
कासेगाव (जि. सांगली) : कासेगाव (ता. वाळवा) येथील घरामध्ये तीनपानी पत्त्यांचा जुगार व दारूअड्डा चालविल्याप्रकरणी सोमवारी रात्री आंतरराष्ट्री कबड्डीपटू काशिलिंग रामचंद्र आडके (वय २७) याच्यासह आठजणांना कासेगाव पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यावेळी एक लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कासेगाव येथील घरामध्ये पत्त्यांचा जुगार व दारूअड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री काशिलिंग आडकेच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तेथे तीनपानी पत्त्यांचा जुगार सुरू होता. पोलीस दिसताच काहीजण पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांना पकडण्यात आले. यावेळी काशिलिंग आडके, पांडुरंग बबन पाटसुते (२८), आरिफ नबीलाल मुल्ला (३२), अतुल पांडुरंग परीट (४०), रसिक इसाक नायकवडी (२३), हर्षद विलास पाटील (२४, सर्व रा. कासेगाव), जोतिराम शिवाजी पाटील (२७, रा. कापूसखेड) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटारसायकली, विदेशी दारू असा एकूण एक लाख ६१ हजार २८० रुपयांचा माल जप्त केला.
काशिलिंग व्यसनाच्या आहारी
काशिलिंग आडके याला प्रो-कबड्डी लीगच्या दुसºया सत्रात ‘बेस्ट रायडर’चा बहुमान मिळाला होता. परंतु, गतवर्षी प्रो-लीग कबड्डीमध्ये त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. त्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. पेट्रोलियम कंपनीतील त्याची नोकरीही सुटली होती. त्यामुळे त्याला दारूचे व जुगाराचे व्यसन लागल्याची चर्चा आहे. स्वत:च्या घरात तो जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
कडक निर्बंधामध्येही जुगारअड्डा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असून, जमावबंदीच्या कडक निर्बंधामध्येही कासेगाव येथे जुगारअड्डा सुरू होता. कबड्डीपटूकडून असे कृत्य घडल्याबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.