डोळ्यात मिरची पावडर टाकून आठ लाख लुटणाऱ्या आठ जणांना अटक

By निलेश जोशी | Published: October 25, 2023 07:55 PM2023-10-25T19:55:32+5:302023-10-25T19:55:40+5:30

२ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त : आरोपी सराईत गुन्हेगार

Eight people were arrested for robbing eight lakhs by putting chilli powder in their eyes | डोळ्यात मिरची पावडर टाकून आठ लाख लुटणाऱ्या आठ जणांना अटक

डोळ्यात मिरची पावडर टाकून आठ लाख लुटणाऱ्या आठ जणांना अटक

बुलढाणा : किराणा मालाची वसुली करत मोठी रक्कम मालकाकडे घेऊन जाणाऱ्यांना डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण करत दोन प्रकरणात तब्बल ८ लाख २१ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींना अवघ्या सात दिवसांत बुलढाणा पोलिस दलाने अटक केली आहे. दरम्यान यातील सहा आरोपी हे छत्रपती संभाजीनगरमधील सराईत गुन्हेगार आहेत.

एक आरोपी मलकापूरमधील असून एक आरोपी हा विधीसंघर्ष बालक आहे. बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा पोलिस ठाण्याअंतर्गत किराणा मालाची वसूल करून वाहनाद्वारे जात असलेल्या राजू हरी गव्हाळे यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावून गव्हाळेंसह हनाचा चालक डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना मारहाण करत ३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी १८ ऑक्टोबर रोजी लंपास केला होता.

ही घटना घडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी किनगावराजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही विष्णू पंढरीनाथ काकड (३४, रा. किनगावराजा) यांनी किराणा मालाच्या मोबदल्यात जमा केलेले ४ लाख ४३ हजार ३७२ रुपये दुचाकीवरील आलेल्या सहा जणांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून लंपास केले होते. या दोन्ही घटना जनमसामान्यामध्ये भीती निर्माण करणाऱ्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आरोपींच्या शोधासाठी नांदुरा, किनगावराजा आणि स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके नियुक्त करण्यात आली होती.

या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारावर येरळी येथील प्रकरणात अंशू विजय जावळेकर (१९, रा. आठवडी बाजार, मलकापूर) आणि एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख ५३ हजार ४९० रुपये, ॲपल कंपनीचा ५१ हजार रुपयांचा मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली १ लाख ५० हजार रुपयांची दुचाकी जप्त केली. दरम्यान किनगावराजा पोलिस ठाण्याअंतर्गत दुसरबीड नजीकच्या दुसऱ्या प्रकरणात गोपनीय माहितीच्या आधारावर छत्रपती संभागीनगरमधून बाळू भागाजी मळखे (२६, डॉ.आंबेकरनगर), रामेश्वर ऊर्फ अंकुश हिवाळे (रा. मुकुंदवाडी), अजय संजय जाधव (२४, रा. सूतगिरणी गारखेडा परिसर), आकाश प्रभाकर साळवे (२५, रा. मुकुंदवाडी), कैलास गबाप्पा जितकर (४४, रा. दुसरबीड) आणि लक्ष्मी मधुकर बोरूडे (पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Eight people were arrested for robbing eight lakhs by putting chilli powder in their eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.