पाकिस्तानात आठ शिक्षकांची केली हत्या; दोन पंथांतील वैमनस्यातून घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 10:12 AM2023-05-05T10:12:53+5:302023-05-05T10:13:04+5:30
ही आदिवासी जमात सुन्नीपंथीय आहे. तसेच दुसऱ्या घटनेत शियापंथीय असलेल्या टोरी आदिवासी जमातीतील सात शिक्षकांची हत्या झाली.
पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात दोन स्वतंत्र घटनांमध्ये मिळून आठ शिक्षकांची हल्लेखोरांनी हत्या केली आहे. हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेलगत आहे. दोन पंथांमधील वैमनस्यातून या हत्या झाल्या असाव्यात असा पोलिसांचा कयास आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अप्पर खुर्राम आदिवासी जिल्ह्यातील शालोझान मार्गावर मुहम्मद शरीफ या तेरी मेंगल आदिवासी जमातीतील शालेय शिक्षकाची हत्या करण्यात आली. ही आदिवासी जमात सुन्नीपंथीय आहे. तसेच दुसऱ्या घटनेत शियापंथीय असलेल्या टोरी आदिवासी जमातीतील सात शिक्षकांची हत्या झाली.
कोहात शिक्षण मंडळ घेत असलेली ९वी, १०वीची परीक्षा शिक्षकांच्या हत्येनंतर पुढे ढकलण्यात आली आहे. हल्लेखोरांना अटक होत नाही तोवर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ऑल खुर्राम टीचर्स असोसिएशनने घेतला आहे.
सिंध प्रांतात ५० हिंदूंचे धर्मांतर
पाकिस्तानातील सिंध प्रांतात दहा हिंदू कुटुंबांतील ५० जणांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याची घटना घडली आहे. पाकिस्तान सरकारच्या आशीर्वादाने हे सामूहिक धर्मांतर पार पडल्याचा आरोप तेथील हिंदू नेत्यांनी केला आहे. मीरपूरखास भागात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांचे धर्मांतर करण्यात आले. त्यामध्ये २३ महिला व एक वर्षे वयाच्या बालिकेचाही समावेश आहे. या धर्मांतरासाठी खास सोहळाही आयोजिण्यात आला होता.
हिंदू युवकाच्या हत्येबद्दल गुन्हा
पाकिस्तानमधील सिंध प्रांतात कमल किशन या हिंदू युवकाच्या हत्येप्रकरणी पोलिस अधिकारी फर्मान शहा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. १ मे रोजी कमल किशनची फर्मान याने गोळ्या झाडून हत्या केली अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती.