Eknath Khadse: एकनाथ खडसे यांची लोणावळा, जळगावमधील ५ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 07:36 AM2021-08-28T07:36:02+5:302021-08-28T07:36:24+5:30
खडसेंवर असलेल्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे व त्यांचा जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. याचा बाजारभाव ३१ कोटी असताना गिरीश याने तो अवघ्या तीन कोटींना विकत घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली.
खडसेंवर असलेल्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे व त्यांचा जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. याचा बाजारभाव ३१ कोटी असताना गिरीश याने तो अवघ्या तीन कोटींना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किमतीत व्यवहार कसा झाला? गिरीश याने तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? याबाबत ‘ईडी’ चा तपास सुरू आहे.
ईडीने या प्रकरणात गिरीश चौधरी याला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची या प्रकरणी चौकशी केली असून त्यांच्या पत्नी आणि जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. तसेच, खडसेंच्या कन्या अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला नोटीस बजावून संत मुक्ताई साखर कारखान्यास कर्ज दिल्याप्रकरणी कागदपत्रे मागविली आहेत.
ठेवीही गोठविल्या
एकनाथ खडसे यांच्या ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणताना ईडीने खडसे यांचा लोणावळा येथील बंगला, जळगाव येथील तीन जमिनी आणि तीन फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, बँकेतील ८६ लाखांच्या ठेवीसुद्धा गोठविल्या आहेत, अशी माहिती मिळते आहे.