पोलिसांसमोरच शिवसैनिकांची वयोवृद्ध नागरिकाला मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
By प्रविण मरगळे | Published: February 7, 2021 12:40 PM2021-02-07T12:40:12+5:302021-02-07T12:43:16+5:30
याठिकाणी पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी शिरीष काटेकर यांना मारहाण केल्याचं दृश्यांमधून दिसत आहे
पंढरपूर – शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका वयोवृद्ध नागरिकाला बेदम मारहाण करत त्यांच्या तोंडावर काळं फासल्याची घटना घडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशांत जगताप नावाच्या कार्यकर्त्याने हा व्हिडीओ ६ फेब्रुवारी रोजी ट्विटरवर अपलोड केला आहे. त्याने प्रोफाईलमध्ये आपली ओळख शिवसैनिक अशी केली असून युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्यासोबतचा फोटो डीपीला ठेवला आहे.
या व्हिडिओत असं दिसून येत आहे की, काही कार्यकर्ते एका व्यक्तीला घेरून त्याला पकडून घेऊन जात आहेत, या व्यक्तीच्या चेहऱ्याला काळा बुक्का फासण्यात आला आहे, यांचं नाव शिरीष काटेकर असल्याचं बोललं जात आहे. काटेकर हे भाजपा आणि आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचं सांगितले गेले आहे. काटेकर यांना बांगड्याचा हार आणि साडी देण्यात आली, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
शिरीष कटेकर या भाजपा च्या दलालाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर केलेली खालच्या पातळीवरील टिका केली शिवसेना पंढरपुर शहर च्या पदाधिकाऱ्यानी त्याला साडी, बांगड्याचा हार आणि बुक्का लावून काळे फासले व शिवसेना स्टाईल ने चोप देण्यात आला..🔥💪
— Prashant Jagtap 🇮🇳🚩🏹 (@IMJagtapPK_9) February 6, 2021
औकातीत रहा..😏 pic.twitter.com/uXjRFIOX8a
याठिकाणी पोलिसांसमोर कार्यकर्त्यांनी शिरीष काटेकर यांना मारहाण केल्याचं दृश्यांमधून दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर टीका केल्याने शिवसेनेच्या पंढरपूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी ही मारहाण केल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंविरोधात बोलतो असं म्हणत कार्यकर्त्यांनी शिवसेना स्टाईलने चोप दिल्याचं प्रशांत जगताप या युजर्सने ट्विटरमध्ये लिहिलं आहे. इतकचं नाही तर याला नॉर्मल चोप दिला असून १५-२० हाडं मोडली असल्याची माहिती आहे, ६ महिनेतरी आयसीयूत ठेवावे लागेल असं या शिवसैनिकाने ट्विटरमध्ये म्हटलं आहे. याबाबत अद्याप शिवसेनेची प्रतिक्रिया मिळाली नाही.
शिवसैनिकांनी केली होती निवृत्त नौदल कर्मचाऱ्याला मारहाण
काही महिन्यांपूर्वी कांदिवली येथे शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती, हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं होतं, संरक्षण मंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत या प्रकरणावर सगळ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियात पोस्ट केली होती, याचाच राग मनात ठेऊन काही शिवसैनिकांनी या कर्मचाऱ्याला घरातून उचलून बाहेर आणत मारहाण केली होती, ही घटना सीसीटीव्ही कैद झाली होती, यामुळे शिवसेना अडचणी सापडली होती.