वृद्ध पित्याला घराबाहेर काढले, मुलासह महिलेविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 03:45 PM2022-11-20T15:45:46+5:302022-11-20T15:46:01+5:30
याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश तुळशीराम गादे (रा. मायानगर) व एका महिलेविरूद्ध ज्येष्ठ नागरिक कायद्यातील कलम २४ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
अमरावती : वृद्ध पित्याला घराबाहेर काढण्यात आले. त्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० च्या सुमारास मायानगर येथील अडवाणी लेआऊट येथे ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी आरोपी गणेश तुळशीराम गादे (रा. मायानगर) व एका महिलेविरूद्ध ज्येष्ठ नागरिक कायद्यातील कलम २४ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, तुळशीराम गादे हे ७५ वर्षीय वृद्ध असून, ते मुलगा गणेश याच्याकडे अडवाणी लेआऊटमध्ये राहतात. मात्र, १७ नोव्हेंबर रोजी गणेश व एका महिलेने संगणमत करून त्यांच्याशी वाद घातला. तथा त्यांना जेवायला दिले नाही. तर, एका महिलेने तुळशीराम गादे यांना काठीने डोक्यावर मारहाण केली. शिविगाळ करून घराबाहेर काढून दिले.
संपूर्ण रात्र थंडीत कुडकुडत काढत गादे यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. आपल्याला सांभाळायची जबाबदारी मुलाची असताना तो सांभाळत नाही, जेवायला देखील देत नाही. इतकेच काय तर, त्यांना उपचाराकरिता पैसे देखील देत नसल्याची तक्रार त्यांनी नोंदविली. दरम्यान, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक आरती गवई करीत आहेत.
काय आहे ज्येष्ठ नागरिक कायदा?
वृद्धांना आर्थिक सुरक्षा, वैद्यकीय सुरक्षा, देखरेख (राहण्याचा खर्च) आणि संरक्षण देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कायदा, २००७ लागू करण्यात आला आहे. त्यातील कलम २४ नुसार, ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषणाची जबाबदारी असलेली मुले, पालक अशा व्यक्तिंनी ज्येष्ठ नागरिकांना, कायम स्वरूपी अथवा तात्पुरते सोडून देण्याच्या उद्देशाने कृती केली असल्यास या कायद्या अंतर्गत असे करणाऱ्या व्यक्तीस तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास / अथवा पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोनही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे.