वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून सोडले घरी; घरात सापडला लाखोंचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 06:43 PM2021-09-03T18:43:58+5:302021-09-03T18:46:39+5:30
Crime News : वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असून नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील एका पडक्या बैरेकच्या घरात राहणाऱ्या वृद्धेच्या घरात पोलीस तपासणीत सोन्याच्या दागिन्यासह जुन्या नोटा व विविध योजनेत लाखो रुपये गुंतविल्याचे उघड झाले. वृद्धेवर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले असून नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील पडक्या बैरेकच्या घरात ८० वर्षाच्या वृद्ध कौशल्या वाधवा एकट्याच राहत असून त्यांची तब्येत बरोबर नसल्याची माहिती उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी व समाजसेवक पप्पू पमनानी यांना मिळाली. वृद्ध व आजारी कौशल्या वाधवा यांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यास, घरात चोरी होईल. असा संशय आल्यावर, याबाबतची माहिती सहायक आयुक्त डी टी टेळे व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांना दिली. त्यांनी तेजवानी यांच्यासोबत उपनिरीक्षक आर.आर.पाटील यांच्यासोबत दोन पोलीस हवालदाराला पाठविले. त्यांनी वृद्ध कौशल्या वाधवा यांच्या सहमतीने घरातील मोठे कपाट उघडून रीतसर पंचनामा केला.
वृद्धेच्या कपाटातून जुन्या ५०० रूपयांच्या एकून ८५ हजाराच्या नोटा, तसेच १०० रुपयांच्या नोटांचे एक लहान बंडल, सोन्याच्या बांगळ्या, कुंडले, विविध दोन बँकेत प्रत्येकी २ व १ लाख रुपये आणि फिक्स डिपॉझिट मध्ये ८ लाख असे लाखोंचे घबाड मिळाले. पोलिसांनी सर्व ऐवज पंचनामा करून ताब्यात घेतला. वृद्धेला रुग्णालयात उपचार केल्यानंतर, घरी सोडण्यात आले असून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, बँकेचे फिक्स डिपॉझिट कागदपत्रे व खाते असा ऐवज वृद्ध व नातेवाईकांच्या ताब्यात दिला. वृद्धेच्या पतीचे यापूर्वी निधन झाले असून त्यांना अपत्य नाही. गेल्या वर्षी मुंबईला राहणाऱ्या पुतण्याने निधन झाले असून त्यांची पत्नी जिवंत असल्याची माहिती जगदीश तेजवानी यांनी दिली. वृद्धेच्या घरात जुन्या ५०० रुपयांच्या नोटा, १०० रुपयांच्या नोटा, सोन्याचे दागिने, बँक खात्यात ३ लाख, ८ लाखाचे फिक्स डिपॉजिट मिळाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला.