चहा न दिल्याच्या रागातून केली वृद्ध आईची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:26 AM2019-06-04T04:26:13+5:302019-06-04T04:26:19+5:30
धारावीतील घटना, सावत्र मुलगा अटकेत
मुंबई : सकाळी चहा न दिल्याच्या रागात सावत्र मुलाने ६५ वर्षीय आईचा गळा दाबून तिला भिंतीवर ढकलले. यात डोक्याला जबर मार बसल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना धारावीत रविवारी घडली. धारावी पोलिसांनी सावत्र मुलगा हनुमंता देवराज (३८) याला अटक केली.
धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीच्या राजीव गांधी नगर येथील झोपडपट्टीत सुशीलाम्मा बालप्पा पोतराज (६५) या एकट्याच राहत होत्या. हनुमंता सुशीलाम्मा यांच्या जेवणाबरोबर औषधोपचारही बघायचा. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत गोवंडीत राहतो.
सुशीलाम्मा यांना भेटण्यासाठी तो अधूनमधून घरी येत असे. रविवारी तो सकाळीच घरी आला आणि त्याने चहा बनवून देण्यास सांगितले. त्या झोपेत असल्याने लवकर उठल्या नाहीत. याच रागात त्याने त्यांचा गळा दाबला. त्या ओरडू लागल्याने त्यांचे तोंड दाबले. रागाने त्यांना भिंतीवर ढकलले. यात डोक्याला जबर मार बसल्याने त्या बेशुद्ध पडल्या. हे पाहून त्याने घटनास्थळावरून पळ काढत गोवंडीतील घर गाठले. स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे गेले. त्या वेळी हनुमंताही नातेवाइकांसह आला. सुशीलाम्मा यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
मारेकऱ्याचा शोधात तोही सहभागी
अनोळखी व्यक्तीने तिची हत्या केली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी हनुमंताही नातेवाइकांच्या गर्दीत सहभागी झाला होता. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तपासात हनुमंताच तिच्या घरी येत-जात असे, अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्याची उलटतपासणी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार सोमवारी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.