वृद्ध महिलेला मारहाण करत लुबाडले, वांद्रे परिसरातील धक्कादायक प्रकार

By गौरी टेंबकर | Published: September 19, 2022 05:59 PM2022-09-19T17:59:32+5:302022-09-19T17:59:51+5:30

वांद्रे येथील रहिवासी असलेल्या ७८ वर्षीय महिलेवर गुरुवारी बँकेतून पैसे काढून घरी परतत असताना दोघांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली.

Elderly woman beaten and robbed shocking incident in Bandra area | वृद्ध महिलेला मारहाण करत लुबाडले, वांद्रे परिसरातील धक्कादायक प्रकार

वृद्ध महिलेला मारहाण करत लुबाडले, वांद्रे परिसरातील धक्कादायक प्रकार

Next

मुंबई : वांद्रे येथील रहिवासी असलेल्या ७८ वर्षीय महिलेवर गुरुवारी बँकेतून पैसे काढून घरी परतत असताना दोघांनी मारहाण करून लुटले. पीडित तुडी जोसेफ मॅथ्यूज यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला सेवानिवृत्त असून त्या त्यांचा मोठा भाऊ आणि दोन बहिणींसह वांद्रे पश्चिम येथील बोरान रोड येथे राहतात. १५ सप्टेंबर रोजी त्या हिल रोड येथील बँक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी बँकेतून १५ हजार रुपये काढले. नंतर सर्व पैसे पर्समध्ये ठेवले होते. त्या घरी जात असताना २० ते २५ वयोगटातील दोन व्यक्ती बँकेकडूनच तिचा पाठलाग करत होते. दरम्यान जेव्हा त्या नगरपालिकेच्या बागेत आल्या तेव्हा एका आरोपीने त्यांना पाठीमागून ढकलले आणि तिच्या चेहऱ्यावर जखम होऊन त्या जमिनीवर पडल्या.  त्यानंतर आणखी एका आरोपीने त्यांचे डोके जमिनीवर आपटले तर त्याच्या साथीदाराने पर्स हिसकावून त्यातील २५ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली,” असे वांद्रे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांनी सांगितले.

त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेने आपल्या भाचीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. ती आली आणि पीडित महिलेला भाभा रुग्णालयात घेऊन गेली. त्यांच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर सूज असल्याने त्यांचा एक्स-रे करण्यात आला, असे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी तिच्या भाचीसह वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले ज्यामध्ये आरोपीचे काही फुटेज सापडले असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपी वांद्रे भागातील नसावे असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार पोलीस शहरातील मागील गुन्हेगारी रेकॉर्ड तपासत आहेत. त्यानुसार लवकरच आरोपींना अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title: Elderly woman beaten and robbed shocking incident in Bandra area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyचोरी