वयोवृद्ध महिलेने चोरल्या देवाच्या मुर्ती, एलसीबीकडून अटक; सांगली मिरजेतील दोन गुन्हे उघडकीस
By शीतल पाटील | Published: July 17, 2023 11:49 PM2023-07-17T23:49:22+5:302023-07-17T23:50:55+5:30
या महिलेकडून ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस तपासात सांगली आणि मिरज शहरातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सांगली : उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून देवाच्या चांदीची मूर्ती आणि साहित्य चोरणाऱ्या ७२ वर्षीय वृध्देला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. या महिलेकडून ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस तपासात सांगली आणि मिरज शहरातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सुप्रभा दत्तात्रय महाडीक ( रा. कोरेगावकर कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या वृध्देचे नाव आहे.
शहरात काही दिवसांपासून घराचे दार उघडे असल्याचे पाहून दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गस्तीमध्ये वाढ केली आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालय परिसरात एक वृद्ध महिला थांबली असून तिच्या पिशवीत चांदीचे साहित्य असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वृध्देकडे चौकशी केली. तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडे देवाच्या चांदीची मूर्ती आणि इतर साहित्य आढळून आले. पोलीस तपासात वृध्देने मागील आठवड्यात मिरज येथील शिवाजीनगर येथे तर आठ महिन्यापूर्वी सांगलीतील गावभाग येथून चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी चांदीच्या चार मूर्ती आणि चांदीचा ग्लास, वाटी असे साहित्य असा ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत सहा. पोलीस निरिक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरिक्षक कुमार पाटील, पोलीस कर्मचारी शुभांगी मुळीक, बिरोबा नरळे, सागर लवटे, विक्रम खोत आदींनी सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात चार गुन्हे
सुप्रभा महाडिक ही सराईत गुन्हेगार आहे. दरवाजा उघडा असल्याचे पाहून ती घरात शिरते. घरातील देवाच्या मुर्ती व इतर साहित्य चोरून पलायन करते. तिच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.