प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला दिला विजेचा शॉक; रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली बायको
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 07:26 AM2020-07-09T07:26:44+5:302020-07-09T07:28:46+5:30
पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमनंतर कुटुंबाच्या हवाली केला. नातेवाईकांनीही विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याचं मानत महिलेच्या पतीवर अंत्यसंस्कार केले.
बाडमेर – राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ज्यात एका महिलेने प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या पतीची हत्या केली आहे. कोणालाही खबर लागणार नाही अशारितीने महिलेने शिताफीने नवऱ्याची हत्या केली. घरच्यांनाही कोणताही संशय न येता सामान्य पद्धतीनं पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेने नातेवाईक आणि पोलीस यांना पतीचा मृत्यू करंट लागून झाल्याचं सांगितलं होतं.
पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमनंतर कुटुंबाच्या हवाली केला. नातेवाईकांनीही विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याचं मानत महिलेच्या पतीवर अंत्यसंस्कार केले. घटनेनंतर मृत पतीचा भाऊ तोगारामला वारंवार वहिनीवर संशय घेत होता. कुटुंबातील इतर सदस्यांनी मृतक मानाराम यांच्या पत्नीला विचारलं असता तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरं येत होती. पण ३-४ दिवसानंतर घरच्यांनी कठोरपणे तिला विचारले असता तिने घडलेला सगळा प्रकार कुटुंबाला सांगितला त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
या आरोपी महिलेने सांगितले की, तिने नवऱ्याला प्रियकरासोबत मिळून विजेचा करंट देऊन मारुन टाकलं. त्यानंतर संपूर्ण रात्र महिला मृतदेहासोबत झोपली होती. ज्यामुळे इतर कोणालाही संशय येणार नाही. आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करुन याची चौकशी सुरु केली आहे. आरोपी महिलेने कुटुंबाला सांगितले की, गावात राहणाऱ्या एका युवकाशी तिचे प्रेमसंबंध आहेत. याची भनक पती मानारामला लागली होती. त्यानंतर प्रियकर आणि पत्नीने नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव रचला असं पोलिसांनी सांगितले.
यानंतर एका रात्री आरोपी महिलेने पती मानारामला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर प्रियकर एका विजेची तार घेऊन आला. तारेचा एक टोक प्लगमध्ये टाकलं. तर दुसऱ्या बाजूने गोल रिंग बनवून गाढ झोपेत असणाऱ्या मानारामच्या हात आणि पायाच्या बोटांमध्ये घातलं. त्यानंतर पत्नीने स्विच ऑन केले. यात मानारामला जोरदार विजेचा झटका लागून तडफडून त्याचा मृत्यू झाला असं पोलीस चौकशीत उघड झालं. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली असून प्रियकरालाही ताब्यात घेणार असल्याचं म्हटलं आहे.