मक्तेदारालाच मागितली वीज अभियंत्याने लाच, सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा

By विजय.सैतवाल | Published: September 26, 2023 07:27 PM2023-09-26T19:27:18+5:302023-09-26T19:27:51+5:30

१ लाखापैकी ६० हजार रुपये देऊनही कामासाठी अडवणूक

Electricity engineer asked for bribe from contractors as crime against assistant engineer | मक्तेदारालाच मागितली वीज अभियंत्याने लाच, सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा

मक्तेदारालाच मागितली वीज अभियंत्याने लाच, सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा

googlenewsNext

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाची कुंपण भिंत व बोअरिंगचे काम व्यवस्थित होत नसून ते सुरू ठेवण्यासाठी मक्तेदाराकडून ४० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता विद्याधर गोंडू भालेराव यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तक्रारदाराने फिर्याद देण्यास नकार दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच तक्रार दिली.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराने जिल्ह्यातील नगरदेवळा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाची कुंपण भिंत व बोअरिंग करण्याचे ९ लाख ६५ हजार ३७१ रुपयांच्या कामाचे सबकॉन्ट्रॅक्ट घेतले आहे. या कामाच्या ठिकाणी महावितरणचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) अनिरूद्ध नाईकवाडे यांनी भेट दिली व मक्तेदाराला काम बरोबर होत नसून मुदतीत काम पूर्ण होत नाही म्हणून नोटीस दिली.

त्यानंतर मक्तेदाराने वेळोवेळी नाईकवाडे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी नाईकवाडे यांनी दिलेले काम सुरळीत सुरू ठेवायचे असेल तर त्यासाठी १० टक्के प्रमाणे एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर केलेल्या कामात त्रुटी काढून काम बंद करू व पुढील काम मिळू देणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मक्तेदाराने नाइलाजास्तव ६० हजार रुपये दिले. उर्वरित ४० हजारांची नाईकवाडे यांनी मागणी केली. मात्र, मक्तेदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

या तक्रारीची विभागाने २ जून, ६ जून व १२ जून २०२३ रोजी पडताळणी केली. त्यानंतर तक्रारदारास १२ जून २०२३ रोजी नाईकवाडे यांच्याशी बोलणे करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पाठविले. ते कार्यालयात हजर नसल्याने तक्रारदाराची सहायक अभियंता विद्याधर भालेराव यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी नाईकवाडे यांच्यासाठी २० हजार व स्वत:साठी २० हजार रुपयांची लाच मागितली. याविषयी तक्रारदाराने फिर्याद देण्यास नकार दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्यादी होऊन विद्याधर भालेराव यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भालेराव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव करीत आहेत. दरम्यान, नाईकवाडे यांच्या संदर्भातील तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: Electricity engineer asked for bribe from contractors as crime against assistant engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.