नवापूरमध्ये १ लाख ६५ हजार रुपयांची वीजचोरी
By भूषण.विजय.रामराजे | Published: April 5, 2023 12:14 PM2023-04-05T12:14:31+5:302023-04-05T12:14:50+5:30
याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नंदुरबार : नवापूर शहरातील गोविंद वेडूनगरातील घरात वीज कंपनीच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात १ लाख ६५ हजारांची वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये महावितरणच्या भरारी पथकाचे अभियंता महेश गोपाळ महाजन यांनी नवापूर शहरातील गोविंद वेडूनगरातील प्लॉट क्रमांक ७८ मध्ये राहणारे रिनेश दत्तू गावित यांच्याकडे वीज मीटर तपासणी करून ताब्यात घेतले होते. दरम्यान, मीटरची तपासणी करण्यात आल्यानंतर १० हजार ९३८ युनिट वीजचोरी झाल्याचे स्पष्ट झाले होते. एकूण १ लाख ६५ हजार ५७१ रुपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिस कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी भरारी पथकाचे अभियंता महेश गोपाळ महाजन यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रिनेश दत्तू गावित (५५) यांच्याविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा नवापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.