पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाचा उल्लेख नाही; एल्गार परिषद प्रकरणी आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:42 AM2021-08-24T08:42:35+5:302021-08-24T08:42:45+5:30
एल्गार परिषद प्रकरणाचा प्राथमिक तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी आपल्या प्रस्तावित मसुदा आरोपपत्रात म्हटले आहे की, या शस्त्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याशी संबंध आहे. मात्र, एनआयएने त्यांच्या मसुदा आरोपपत्रात पंतप्रधानांच्या हत्येचा उल्लेख केलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०१८ च्या एल्गार परिषद - माओवादी संबंध प्रकरणातील १५ आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी केला होता. त्यावरून देशात खळबळ माजली होती. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केलेल्या मसुदा आरोपपत्रात आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्यासाठी शस्त्रास्त्रे जमविल्याचे म्हटले आहे. त्यात त्यांनी थेट पंतप्रधानांचा उल्लेख केलेला नाही.
एल्गार परिषद प्रकरणाचा प्राथमिक तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी आपल्या प्रस्तावित मसुदा आरोपपत्रात म्हटले आहे की, या शस्त्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याशी संबंध आहे. मात्र, एनआयएने त्यांच्या मसुदा आरोपपत्रात पंतप्रधानांच्या हत्येचा उल्लेख केलेला नाही. या १५ आरोपींविरोधात एनआयएने विशेष न्यायालयात मसुदा आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपींनी दहशतवादी कारवायांसाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस) च्या विद्यार्थ्यांची भरती केल्याचा दावा एनआयएने यात केला
आहे.
आरोपींवर यूएपीए व भारतीय दंडसंहितेअंतर्गत १६ वेगवेगळे आरोप लावण्यात आले आहेत. त्यामध्ये देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा आरोपही
ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.
संबंधित १५ आरोपी हे बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेशी संबंधित आहेत. राज्यभरातील दलित आणि इतर वर्गाच्या सांप्रदायिक भावनांचे शोषण करण्यासाठी आणि राज्यात व पुणे जिल्ह्यात हिंसाचार, अस्थिरता, अराजकता निर्माण करण्यासाठी जातीच्या नावावर भडकविण्यासाठी
एल्गार परिषद आयोजित करण्यात आली. अत्याधुनिक शस्त्र एम-४ च्या वार्षिक पुरवठ्यासाठी आठ कोटी रुपयांची मागणी किंवा आयोजन करण्यासाठी कट रचला. तसेच दहशतवादी कारवाया अमलात आणण्यासाठी विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची भरती केली, असेही एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.