एल्विशच्या पार्टीत नेमकं काय-काय व्हायचं? 'ती' डायरी सगळं गुढ उकलणार, अडचणी वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 01:50 PM2023-11-15T13:50:05+5:302023-11-15T13:51:05+5:30
बिग बॉस ओटीटी सीझन-२ चा विजेता एल्विश यादव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टीचा आरोप एल्विश यादववर आहे.
नवी दिल्ली-
बिग बॉस ओटीटी सीझन-२ चा विजेता एल्विश यादव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टीचा आरोप एल्विश यादववर आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानं चौकशीवेळी हरियाणवी गायिका फाजिलपुरिया हिचं नाव घेतलं होतं. आता याप्रकरणात दररोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. विषारी सापांच्या तस्करीच्याबाबतीत पोलिसांना आता काही धागेदोरे हाती लागले आहेत.
नोएडा पोलिसांना याप्रकरणात चौकशी करत असताना मुख्य आरोपी राहुल याची डायरी मिळाली आहे. या डायरीतून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. राहुलच्या डायरीत पार्टीच्या आयोजकांची नाव नमूद असल्याची माहिती समोर आली आहे. नोएडा पोलिसांची दोन पथकं राहुल याची चौकशी करत आहेत आणि त्याच्या डायरीचाही तपास केला जात आहे. एक पथक डायरीतील नमूद नावांशी संपर्क करत आहे. तर दुसरं पथक डायरीत नमूद असलेल्या ठिकाणांना भेट देऊन पुरावे एकत्र करण्याचं काम करत आहे.
राहुलच्या डायरीतून होणार मोठे खुलासे
सुत्रांच्या माहितीनुसार, डायरीमध्ये अनेकांच्या नावांचा उल्लेख आहे. यात गुरुग्राममध्ये झालेल्या एका पार्टीचाही उल्लेख आहे. पार्टीत नेमकं काय-काय झालं होतं याची माहिती पोलीस घेत आहेत. तसंच पार्टीचे व्हिडिओ मिळवण्यासाठीही पोलीस प्रयत्न करत आहेत. राहुल आणि एल्विश यांच्या नेमका काय संवाद झाला होता? याचाही पोलीस तपास करत आहेत. राहुल याप्रकरणाचा प्रमुख आरोपी आहे. हा तोच व्यक्ती आहे ज्याचं रेकॉर्डिंग समोर आलं होतं. ज्यात राहुलनं एल्विश यादव याला ओळखत असल्याची कबुली दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार राहुल आणि एल्विश यादव यांची समोरा-समोर चौकशी केली जाणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नोएडा पोलिसांनी सेक्टर-४९ मध्ये टाकलेल्या एका धाडीत विषारी साप आणि त्यांचं विष जप्त केलं होतं. पोलिसांना राहुल याच्याकडे 20ml विष सापडलं होतं. त्यानंतर रेव्ह पार्टीत सापांचं विष नशेसाठी वापरलं जात असल्याचं निष्पन्न झालं आणि याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणात यूट्यूबर एल्विश यादवचंही नाव पुढे आलं आहे. त्याच्यावर अवैधरित्या सापांच्या विषाची तस्करी केल्याचा आणि रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. सध्या सर्वजण पोलीस कोठडीत आहेत.