तरुणीचा हात पकडून लज्जास्पद वर्तन; सोडवणाऱ्या आई अन् भावाला मारहाण
By विलास जळकोटकर | Published: April 8, 2024 03:00 PM2024-04-08T15:00:44+5:302024-04-08T15:01:02+5:30
चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा : काठी, विटांचा वापर
सोलापूर : किराणा दुकानातून दूध आणण्यासाठी निघालेल्या २० वर्षीय तरुणीला दुचाकीवरुन आलेल्या तरुणाने अडवून तिचा हात पकडला आणि तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. विचारणा करता पिडितेसह सोडवणूक करणाऱ्या तिच्या आई आणि भावाला लाथाबुक्क्याने, काठ्या, दगडांने बेदम मारहाण केली. हा प्रकार शहरातील एका नगरामध्ये रात्री ९:३० च्या सुमारास घडला. या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदला आहे. सचिन सोनवणे, पिंकी सोनवणे, मोहिनी बनसोडे, भैय्या बनसोडे (रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी मूळ दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील असून, सध्या सोलापूर शहरातील एका नगरामध्ये वास्तव्यास आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ती घरातून किराणा दुकानाकडे दूध आणण्यासाठी निघाली होती. वाटेत वरील आरोपी १ याने दुचाकी आडवी लावून पिडितेला अडवले. तिच्या हाताला धरुन ओढले. डोळे वटारुन दात दाखवून तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले. पिडितेने यावर विचारणा केली असता तिला व तिच्या भावानं जाब विचारला तेव्हा नमूद आरोपींनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण सुरु केली.
या प्रकाराबद्दल पिडितेच्या आईला समजताच ती भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली. तिलाही चौघांनी काठी आणि विटाच्या तुकड्याने मारहाण करुन जखमी केले. शेजाऱ्यांनी भांडण सोडवले. नमूद आरोपी १ याने लज्जास्पद वर्तन आणि अन्य तिघांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी तपास जोडभावी पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.