निर्यातीस पाठविलेल्या मण्यांसह कारपेटचा अपहार; ३० सप्टेबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:13 AM2020-09-19T01:13:40+5:302020-09-19T01:13:59+5:30
मुंबईतील एका ट्रान्सपोर्टचा ट्रक घेऊन मेहफूज कुरेशी हा चालक उत्तर प्रदेशातून मुंबईत येण्यासाठी १६ जून रोजी निघाला होता. मात्र, हा ट्रक रिकामा येण्याऐवजी त्यात काही सामान घेऊन येतो, असे त्याने ट्रान्सपोर्टचे मालक त्रिपाठी यांना सांगितले.
ठाणे : उत्तर प्रदेशातून थेट जपानमध्ये नेण्यात येणारे कारपेट, तसेच किमती मणी असलेल्या ५५ लाखांच्या मालाचा परस्पर अपहार करणारा चालक मेहफूज कुरेशी (२१), त्याचे साथीदार जफरुल ऊर्फ जाफर कुरेशी (३५) आणि अजिज मलिक (३०, राहणार तिघेही उत्तर प्रदेश) या तिघांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर मध्यवर्ती कारागृहातून नुकतेच ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे १० लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
मुंबईतील एका ट्रान्सपोर्टचा ट्रक घेऊन मेहफूज कुरेशी हा चालक उत्तर प्रदेशातून मुंबईत येण्यासाठी १६ जून रोजी निघाला होता. मात्र, हा ट्रक रिकामा येण्याऐवजी त्यात काही सामान घेऊन येतो, असे त्याने ट्रान्सपोर्टचे मालक त्रिपाठी यांना सांगितले. त्यांनी परवानगी देताच उत्तर प्रदेशातील संदीप पांडे यांचे जपान येथे निर्यात होणारे मणी आणि कारपेट असा ५५ लाखांचा माल त्याने जेएनपीटी बंदरामध्ये नेण्यासाठी ट्रकमध्ये भरला. मात्र, तो वाटेतच शहापूर भागात परस्पर रिकामा करून कुरेशी त्याच्या साथीदारांसह पसार झाला होता. रिकामा ट्रक मिळाल्यानंतर पांडे यांनी या प्रकरणी २७ जून रोजी शहापूर पोलीस ठाण्यात अपहाराची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, नागपुरातील पारधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ३५ लाखांच्या चहाच्या अपहाराच्या अशाच गुन्ह्यात कुरेशीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्या आधारे नागपूर न्यायालयामार्फत नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ८ सप्टेंबर रोजी या तिघांचाही ताबा घेतला. त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत शहापूर न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
३० सप्टेबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
मेहफूज अशाच प्रकारे ट्रान्सपोर्टचा माल चोरायचा. तर जाफर आणि अजिज हे दोघेही त्यासाठी गिºहाईक शोधायचे. त्याच्या विक्रीनंतरही हे तिघे आणि त्यांचे दोन साथीदार आपसात पैसे वाटून घेणार होते.
दोन साथीदारांचा व उर्वरित मालाचा शोध घेण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी मेहफूज कुरेशीसह तिघांनाही ३० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शहापूर न्यायालयाने दिले. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी त्यांची रवानगी पुन्हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात केली आहे.