Crime News: आईच्या मृत्यूमुळे भावनिक झाली लंडनहून आलेली महिला डॉक्टर; जांघेतील नस कापून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 09:11 AM2022-01-31T09:11:54+5:302022-01-31T09:12:12+5:30
Emotional News: मेघाच्या वडिलांना कॅन्सर आहे, तर भावाचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. कुटुंबात आता मेघाचे वडील, वहिणी आणि भाची असे सदस्य उरले आहेत.
आजारी आईच्या मृत्यूमुळे धक्का बसल्याने महिला डॉक्टरने शनिवारी सर्जिकल ब्लेडने जांघेतील नस कापत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईवर उपचार करण्यासाठी ती लंडनहून दिल्लीत आली होती. पोलिसांनी पोस्टमार्टेम करून मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सोपविला आहे.
दक्षिण जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनुसार मेघा कायल (४०) असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. ती लंडनमध्ये न्यूरो मेडिसिनची डॉक्टर होती. कोरोनाच्या लाटेत आईवर उपचार करण्यासाठी लंडनहून दिल्लीला आली होती. मेघा अविवाहित होती. २७ जानेवारीला तिच्या आईचा मृत्यू झाला. हा धक्का मेघाला सहन झाला नाही. भावनेच्या भरात तिने नस कापून घेतली. शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास तिला अपोलो हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. जांघेतील नस कापल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला होता. यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वडिलांना कॅन्सर, भावाचा मृत्यू
मेघाच्या वडिलांना कॅन्सर आहे, तर भावाचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. कुटुंबात आता मेघाचे वडील, वहिणी आणि भाची असे सदस्य उरले आहेत. मेघाने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तिने आईच्या मृत्यूचा धक्का बसल्याने मी आईकडे जात असल्याचे लिहीले आहे. आपल्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये, असे तिने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.