मिस यू पापा... मद्यधुंद पोलिसाच्या कारखाली येऊन मृत्यू झालेल्या Zomato बॉयच्या मुलाचं भावूक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 11:40 AM2022-01-12T11:40:29+5:302022-01-12T11:40:48+5:30
Delhi Zomato Executive Accident News : पत्राद्वारे चिमुरड्यानं केली न्याय मिळवून देण्याची मागणी.
दिल्लीच्या (Delhi) रोहिणी भागात, दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका दिल्ली पोलिस हवालदाराने एका डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) धडक दिली, ज्याचा मृत्यू झाला. सलील त्रिपाठी असे या तरुणाचे नाव असून तो झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. या घटनेच्या काही काळापूर्वीच त्रिपाठी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सलील त्रिपाठी यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. दरम्यान, सलिल त्रिपाठी यांच्या मुलानं एक भावूक पत्र लिहित आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे.
सोशल मीडियावर (Social Media) चिठ्ठीसह सलील त्रिपाठी यांच्या मुलाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. "मला माझ्या वडिलांसाठी न्याय हवा आहे. मी सलील त्रिपाठी यांचा मुलगा आहे. माझे वडील हॉटेलमध्ये मॅनेजर होते. परंतु कोरोनामुळे त्यांना झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करावं लागत होतं. त्यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या कुटुंबाची मदत करा. मिस यू पापा," असं त्या तिसरीत शिकणाऱ्या चिमुरड्यानं लिहिलं आहे.
पोलिसाला ३ दिवसात जामीन
ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर मद्यधुंद अवस्थेत त्रिपाठी यांना गाडीखाली चिरडण्याचा आरोप आहे, त्यांना तीनच दिवसांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, नेते मंडळी आणि दिल्ली पोलिसांनाही न्याय मिळवून देण्यासाठी पत्र लिहिल्याची माहिती सलिल त्रिपाठी यांच्या काकांनी दिली. आम्हाला मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घ्यायची आहे, असंही ते म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कॉन्स्टेबलच्या रक्ताचे नमूने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. यावरून त्यांनी मद्य घेतलं होतं का नाही याची माहिती मिळणार आहे.
कोरोनामुळे गेली होती नोकरी
"सलिल यांनी मुलाचं भविष्य उज्ज्वल करण्याचा विचार केला होता. २०१६ मध्ये आम्ही रोहिणीतील एका शाळेत अॅडमिशन केली होती. परंतु सलिल यांची नोकरी गेल्यानंतर शाळेकडून फीसाठी दबाव येऊ लागला. फीसाठी ८ हजार रुपये जमा करायचे होते. परंतु सातत्यानं त्यांच्याकडून रिमांईंडर येत होते. नाईलाजानं आम्हाला त्याला शाळेतून काढून दुसरीकडे टाकावं लागलं," असं सलिल यांच्या पत्नीनं सांगितलं.
कोरोनामुळे आपले वडील आणि नोकरी गमावल्यानं ते हताश झाले होते. त्यानंतर त्यांनी फुड डिलिव्हरीचं काम सुरू केलं. यादरम्यान त्यांना पुन्हा हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं. परंतु पुन्हा त्यांची नोकरी गेली. शनिवारी परत ते फुड डिलिव्हरीच्या कामावर निघाले होते आणि पहिल्याच दिवशी हा अपघात झाला, असं त्यांच्या काकांनी सांगितलं.
कुटुंबीयांना मिळतेय मदत
दरम्यान, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत सलिल यांच्या पत्नीच्या खात्यात २ लाख रुपयांपर्यंत मदत आल्याची माहिती सलिल यांच्या काकांनी दिली. काही लोकांचे मदतीचं फोनही येत असल्याचं सलिल यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. या मदतीतून जे काही पैसे मिळतील त्याचा वापर मुलाच्या शिक्षणासाठी करण्यात येईल, सलिल यांनी मुलासाठी पाहिलेलं स्वप्न आम्ही पूर्ण करू, असंही ते म्हणाले.