Emotional Suicide Note: "ज्याला ही चिठ्ठी मिळेल त्याने प्लीज..."; भावनिक सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या इमारतीवरून घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:55 PM2022-01-18T16:55:38+5:302022-01-18T16:57:26+5:30
तो तरूण अवघ्या २६ वर्षांचा असून त्याच्या रूमच्या बोर्डवरही त्याने एक संदेश लिहून ठेवला होता.
मुंबई: "ज्याला कोणाला ही चिठ्ठी मिळेल त्याने प्लीज माझा मोबाईल फोन माझ्या भावाजवळ द्या, या मोबाईलमध्ये आमच्या काही गोड आठवणी आहेत", अशी चिठ्ठी लिहून २६ वर्षाच्या तरूणाने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. २६ वर्षांचा हा तरूण विद्यार्थीदशेत होता. IIT मुंबईच्या IDC School of Design मध्ये तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तो ज्या हॉस्टेलमध्ये राहत होता, त्याच हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून सोमवारी त्याने उडी मारून आत्महत्या केली.
मुंबईतील पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरील १२ नंबर खोलीतून त्यांना तरूणाने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. आत्महत्या करणारा तरून त्याच खोलीत वास्तव्यास होता. आत्महत्येच्या चिठ्ठीशिवाय त्याने रूममधील एका बोर्डवर आणखी एक संदेश लिहून ठेवला होता. माझ्या आत्महत्येच्या निर्णयासाठी इतर कोणालाही जबाबदार धरू नये, असं त्याने लिहून ठेवलं होतं.
पोलिसांच्या तपासात प्रथमदर्शनी असं दिसून आलं की तो तरूण मूळचा मध्य प्रदेशचा होता. IIT मुंबईमध्ये दाखल होण्याआधीपासूनच तो मानसिकदृष्ट्या थोडासा आजारी होता. IIT मुंबईमध्ये तो अनुभवी प्राध्यापकांकडून काऊन्सेलिंग आणि मानसोपचार घेत होता. तसेच, मानसोपचार तज्ञ्जांकडेही तो उपचार घेत होता. ६ जानेवारीला तो कॅम्पसमधील डॉक्टरांकडेही गेला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.
"तो तरूण हॉस्टेलच्या खोलीत एकटाच राहत होता. हॉस्टेलच्या सात मजली इमारतीवरून त्याने उडी मारली. जोरात आवाज आल्यामुळे सुरक्षा रक्षक त्या दिशेने धावला. पहाटे साडेचारच्या सुमारास ही गोष्ट घडली. सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचला तेव्हा तो तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता", अशी माहिती पवई पोलिसांपैकी अधिकाऱ्याने दिली.
तरूणाने २०२० साली कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. दोन वर्षांचा मास्टर्सचा तो कोर्स होता. पण तो तरूण जुलै २०२१ ला कॉलेजमध्ये आला. त्याआधी तो कॉलेजमध्ये आला नव्हता.