बोगस रेल्वे भरतीप्रकरणी कर्मचारीही रडारवर; उमेदवारांचे भुसावळ, चेन्नईमध्ये ट्रेनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 05:50 AM2023-02-21T05:50:12+5:302023-02-21T05:50:27+5:30
एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. मूळचा साताऱ्याचा रहिवासी असलेला हरिश्चंद्र कदम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे
मुंबई - मंत्रालयापाठोपाठ रेल्वेत १४ लाखांत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत मुंबईसह सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींची फसवणूक झाली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी रेल्वेचे जॉयनिंग लेटर, बनावट ऑर्डर कॉपी देत मुलाखतींबरोबर चेन्नईमध्ये एक महिन्याचे ट्रेनिंग करण्यास भाग पाडून तरुणांचा विश्वास संपादन केला होता. यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचाही काही हात आहे का? या दिशेनेही पोलिस अधिक तपास करत आहे.
एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. मूळचा साताऱ्याचा रहिवासी असलेला हरिश्चंद्र कदम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. रेल्वेतून मेल आल्याचे भासवून बनावट ऑर्डर देऊन, त्यावर बनावट सही करून बनावट शिक्क्यांच्या वापर करून ती ऑर्डर खरी असल्याचे भासवून उमेदवारांना देण्यात आल्या. त्यानुसार, सुरुवातीला भुसावळ ट्रेनिंग सेंटर गाठले. मात्र, तेथे गेल्यानंतर ऑर्डर कॉपी बनावट असल्याचे समजताच तरुणांना धक्का बसला. याबाबत नोकरीची माहिती देत पैसे घेणाऱ्या शिवाजी नामदेव घनगेसोबत संवाद साधल्यानंतर त्यानेही तेथे धाव घेतली. तरुणाला बाहेर थांबवून तो आतमध्ये गेला. त्यानंतर, जवळच्या रुग्णालयात मेडिकल टेस्ट पूर्ण केली. काही दिवसांनी ऑर्डर चुकीची काढल्यामुळे नव्याने ऑर्डर काढणार असल्याचे सांगितले.
खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग
आरोपींनी १३ जणांची यादी देत त्यांना चेन्नईला पाठवले. त्या यादीत घनगे यांच्या मुलीचेही नाव होते. तेथे गेल्यानंतर एका रेल्वेचे ट्रेनिंग सेंटर सांगून एका खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये एक महिना ट्रेनिंग पूर्ण करण्यास भाग पाडल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. यामध्ये फसवणूक झालेल्या उमेदवारांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग?
या रॅकेटमध्ये रेल्वेसह कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हात आहे का? याबाबतही पोलिस अधिक तपास करत आहे.