कर्मचाऱ्यांचा कंपनीच्या अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला चाकू मारला, डोकेही फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 08:13 PM2021-05-20T20:13:28+5:302021-05-20T20:14:23+5:30
Assaulting Case : वैशाली नगरातील रहिवासी असलेले जनबंधू एजी एन्व्हायरमेंट कंपनीत झोन इन्चार्ज आहे.
नागपूर : कंपनीचा अधिकारी पक्षपातीपणाची वागणूक देतो, असा आरोप करून एका कर्मचाऱ्याने त्याच्या साथीदारांसह येऊन लाकडी फळी तसेच चाकूने हल्ला केला. यात अधिकाऱ्याचे डोके फाटल्याने तो गंभीर जखमी झाला. महापालिकेच्या झोन क्रमांक चार मधील बैद्यनाथ चौकाजवळच्या कचरा वाहन तळांमध्ये गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अधिकार्याचे नाव विशाल युवराज जनबंधू (वय ३८) असे आहे.
वैशाली नगरातील रहिवासी असलेले जनबंधू एजी एन्व्हायरमेंट कंपनीत झोन इन्चार्ज आहे. ही कंपनी महापालिकेअंतर्गत कचरा संकलन आणि विल्हेवाटीचे काम करते. कंपनीत अनिकेत सुरेश पत्रे (वय २१) हा कामावर होता. त्याचे काम चांगले नसल्यामुळे त्याला अनेकदा ताकीद देण्यात आली होती. जनबंधू यांनी अनिकेतला गेल्या आठवड्यात चार दिवसासाठी कामावरून निलंबित केले. आज दुपारी २.३० च्या सुमारास अनिकेत त्याच्या एका साथीदारांसह कार्यालयात आला. येथे त्याने जनबंधू यांच्याशी वाद घातला. ते पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप करून शिवीगाळ करत अनिकेतने लाकडी फळीने जनबंधू यांच्या डोक्यावर जोरदार फटका मारला. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अशा स्थितीत आरोपी अनिकेतने त्यांच्यावर चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी अनिकेत आणि त्याचा साथीदार शिवीगाळ करीत पळून गेले. या घटनेमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी जनबंधू यांना पाचपावलीच्या एका खासगी इस्पितळात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल https://t.co/OyErULDzPU
— Lokmat (@MiLOKMAT) May 20, 2021
मिळालेल्या माहितीवरून गणेशपेठचे ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर रुग्णालयात जनबंधू यांना विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र जनबंधू यांची प्रकृती गंभीर असल्याने ते फारसे काही सांगू शकले नाही. कार्यालयातील सहकार्यांनी दिलेल्या माहितीवरून हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपी अनिकेत आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध कलम ३०७,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.