सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांची निर्घृण हत्या करणारा कुख्यात गुंड पोलीस एन्काउंटरमध्ये ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 02:45 PM2023-04-02T14:45:20+5:302023-04-02T14:46:41+5:30
Encounter in Muzaffarnagar: उत्तर प्रदेशात कुख्यात गुंडांविरोधात पोलिस अॅक्शन मोडमध्ये आहेत.
Encounter in Muzaffarnagar:उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Yogi Adityanath) सरकारने गुंडांविरोधात नो टॉलरन्स पॉलिसी अवलंबली आहे. या अंतर्गत आतापर्यंत शेकडो कुख्यात गुंड चकमकीत (Encounter) ठार करण्यात आले आहेत. आता युपी पोलिसांनी (Police) मुजफ्परनगरमधील शाहपूर परिसरात कुख्यात गुंड राशिदला एन्काउंटमध्ये ठार केलं आहे. राशिदवर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते.
विशेष म्हणजे, राशिद भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याच्या तीन नातेवाईकांच्या खुनाच्या प्रकरणात मुख्य आरोपी होता. राशिदने 2020 साली पठाणकोटमध्ये सुरेश रैना याची आत्या, आत्याचे पती आणि चुलत भावाची हत्या केली होती. गुन्हेगारी विश्वात राशिद ‘चलता-फिरता’ आणि ‘सिपहिया’ या नावाने ओळख होती. मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव कुमार म्हणाले, राशिदच्या डोक्यावर 14 ते 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद होती.
UP | A notorious criminal Rashid alias Chalta Firta alias Sipahiya, who carried a cash reward of Rs 50,000 on his head, was killed in an encounter in Muzaffarnagar’s Shahpur area. 14-15 cases were registered against him & he was also wanted in the triple murder of 3 relatives of… pic.twitter.com/oh13jjqygl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 2, 2023
मूळ राजस्थानचा असलेला राशिद गेल्या काही काळापासून मुरादाबादमध्ये राहत होता. शाहपूर परिसरातील जंगलामध्ये त्याला पोलिसांनी ठार केलं. त्याच्याकडून एक बाईक, बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. संजीव कुमार यांनी सांगितले की, काही गुंड शाहपूर परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली.
यावेळी पोलिसांना दोघे बाईकवरुन जाताना दिसले. त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. या घटनेत एकाला गोळी लागली तर त्याचा साथीदार पळून गेला. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याचा मृत्यू झाला. नंतर पोलिसांना समजले की, तो कुख्यात गुंड राशिद आहे.