कोपर्शीच्या जंगलात चकमक : नक्षलवादी साहित्य टाकून झाले फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 07:39 PM2019-09-25T19:39:22+5:302019-09-25T19:42:04+5:30
चार बंदुका जप्त
गडचिरोली - भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कोठी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कोपर्शीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात नक्षलींच्या चार बंदुका आणि दैनंदिन वापराचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले.
प्राप्त माहितीनुसार, कोपर्शीच्या जंगलात नक्षलवाद्यांचा कॅम्प असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवण्यासाठी मंगळवारी (दि.२४) गेलेल्या पोलिसांच्या सी-६० पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पोलीस पथकाने आगेकुच केल्यानंतर नक्षलवाद्यांना पळता भुई थोडी झाली. त्यांनी आपल्याकडील बंदुका आणि दैनंदिन वापरातील साहित्य तिथेच टाकून जंगलाच्या दिशेने पळ काढला.
बुधवारी (दि.२५) सकाळी सी-६० पथकाचे जवान आपल्या कॅम्पवर परत आल्यानंतर त्यांनी चकमकीची सविस्तर माहिती सांगितली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडथळे आणण्यासाठी नक्षलवादी सक्रिय होऊन योजना आखत होते. पण पोलिसांच्या कारवाईने त्यांचा कॅम्प उद्ध्वस्त झाला.