Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:51 AM2022-08-30T00:51:46+5:302022-08-30T00:58:15+5:30
शिवसेनेच्या तिकीटावर लढवली होती 2019 ची विधानसभा निवडणूक...
पुणे- अॅन्टिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जेलमध्येच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रदीप शर्मा यांना पोटात दुखत असल्याने गेल्या 12-15 दिवसांपूर्वीही ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आता, सोनोग्राफी करण्यासाठी आणि पुढील उपचारांसाठी शर्मा ससूनमध्ये आहेत. एन्काऊटंर स्पेशलिस्ट अशी प्रदीप शर्मा यांची ओळख आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांच्या नावावर तब्बल 113 एन्काऊटंरची नोंद आहे.
शिवसेनेच्या तिकीटावर लढवली होती 2019 ची विधानसभा निवडणूक -
प्रदीप शर्मा हे 1983 साली पोलीस दलात रुजू झाले होते. पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख होती. 2008 मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते. मात्र, 2017 मध्ये आरोपांतून क्लिनचिट मिळाल्यानंतर ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते. त्यांनी 2017 मध्येच दाऊदच्या भावालाही अटक केली होती. यानंतर, त्यांनी 2019 साली पोलीस सेवेचा राजीनामा दिला. महत्वाचे म्हणजे, 2019 सालीच प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारामधून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता.