ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगून ११ जणांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 03:11 AM2022-05-07T03:11:21+5:302022-05-07T03:12:13+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीचे दाखवले आमिष
मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवून ११ जणांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संदीप राऊत याच्यावर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळी कोळीवाडा येथील रहिवासी महेश काजवे (५२) यांच्या तक्रारीनुसार, संदीप राऊत याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पैशाच्या बदल्यात महावितरणमध्ये अनेकांची भरती केली आहे. पांढऱ्या टोयोटा इनोव्हा गाडी आणि महागडा मोबाइल घेऊन तो आम्हाला भेटायला यायचा. माझी मुलगी आणि मुलाला महावितरणमध्ये लिपिक पदावर नोकरी देण्याचे वचन दिल्याने मी त्याला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दीड लाख रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याव्यतिरिक्त, रत्नागिरी, डहाणू आणि मुंबई येथील त्यांच्या १० नातेवाइकांनीही राऊत याला आणखी ८ लाख रुपये दिले.
त्यानंतर राऊतने काजवे यांना काही काळ थांबण्यास सांगितले आणि त्यांना नवीन नियुक्तीपत्रे दिली. अखेर ३० मार्च रोजी काजवे हे त्यांचा मुलगा व मुलगी यांच्यासह वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात गेले. त्यांनी नियुक्तीपत्रे दाखवली असता, अधिकाऱ्यांनी ती बनावट असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.
आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. राऊतवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडे त्याचा पत्ता नाही. फक्त मोबाइल क्रमांक आहे. त्यानुसार त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.
- महेश मुगुतराव,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादर पोलीस ठाणे