जयपूरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्याला अटक, खटला रद्द करण्यासाठी घेतली १५ लाखांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 04:15 PM2023-11-02T16:15:48+5:302023-11-02T16:16:57+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.
जयपूर : देशातील अनेक नेत्यांच्या ठिकाणांवर सातत्याने होणारे छापे आणि त्यांच्यावर सुरू असलेली कारवाई, यामुळे सध्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चर्चेत आहे. दरम्यान, राजस्थानमधील तपास यंत्रणा ईडीच्या अधिकाऱ्याकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेतल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) इंफाळच्या एका अधिकाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाच घेतल्याचा आरोप असलेला अधिकारी एका प्रकरणात त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या आरोपीकडून पैसे मागत होता. चिटफंड प्रकरणात एका आरोपीला अटक होऊ नये, यासाठी ईडीच्या अधिकाऱ्याने १७ लाख रुपयांची मागणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला ईडी अधिकारी मणिपूरमधील इंफाळ येथील कार्यालयात काम करत होता. नवल किशोर मीना असे त्याचे नाव आहे. याशिवाय, त्याचा स्थानिक सहकारी बाबुलाल मीणा यालाही अटक करण्यात आली आहे. इंफाळ येथील ईडी कार्यालयात नोंदवलेल्या चिटफंड प्रकरणात त्याच्याविरुद्धचा खटला रद्द करणे, मालमत्ता जप्त न करणे आणि अटक न करण्याच्या बदल्यात १७ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार तक्रारदाराकडून करण्यात आली. ही मागणी आरोपी नवल किशोर मीणा यांनी केली आहे.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्याविरुद्धच्या तक्रारीची पडताळणी केली आणि गुरुवारी आरोपी नवल किशोर मीना उर्फ एनके मीना याला जयपूर येथून अटक केली. यावेळी त्याचा साथीदार बाबुलाल मीना उर्फ दिनेश याच्यामार्फत तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवल किशोर हा मूळचा बस्सीच्या विमलपुरा गावचा रहिवासी आहे. तर त्याचा सहकारी बाबूलाल हा उपनिबंधक कार्यालय-मुंडवार येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.